कोल्हापूर ,दि. ३० : परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. फळांची आवक मात्र कमी होत आहे.
पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी झाली होती. परिणामी दरांत वाढ झाली. वांगी किरकोळ बाजारात ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक त्यापासून दुरावला; पण या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक थोडी-थोडी वाढू लागल्याने दर घसरू लागले आहेत. गत आठवड्यापेक्षा बाजार समितीत भाजीपाल्याची २३०० क्विंटलनी आवक वाढली आहे.
वांग्याचा घाऊक बाजारातील सरासरी दर ४५ रुपयांपर्यंत आला आहे. टोमॅटोच्या आवकेतील चढउतार कायम राहिल्याने प्रत्येक आठवड्याला दर कमी-जास्त होत आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात टोमॅटो ३५ रुपये होता. आता तो ४० रुपये झाला आहे.
या भाज्यांच्या तुलनेने ढबू, ओली मिरची, गवार, कारली, भेंडी, वरण्याचे दर कमी झाले आहेत. दोडका व फ्लॉवरच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथबिरीची पेंढी तीस रुपयांपर्यंत पोहोचली होती. बाजार समितीत रोज पंधरा हजार पेंढीची आवक होत असल्याने दर थोडे कमी झाले आहेत. कांदापात, मेथी, पालक, शेपू, पोकळा या पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
कांद्याची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात तो ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता; पण गत आठवड्याच्या तुलनेत रोज दोन हजार पिशव्यांनी आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात चांगल्या कांद्याचा दर ३२ रुपयांपर्यंत झाला आहे.
बटाटा व लसणाची आवक व दरात फारसा चढउतार दिसत नाही. पावसाच्या तडाख्यातून अजून फळबाजार सावरलेला दिसत नाही. गत आठवड्यापेक्षा ७०० क्विंटलने आवक कमी झाली; पण तिचा दरांवर फारसा परिणाम दिसत नाही.
फळांना मागणीही मर्यादित असल्याने आवकेचा थेट परिणाम झालेला नाही. सीताफळांची आवक मात्र वाढली असून, किरकोळ बाजारात सरासरी ३० रुपये किलो असा दर राहिला आहे.
दिवाळी संपल्याने कडधान्य बाजारात थोडी मंदी दिसत आहे. तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत दोन रुपयांनी घसरण झाली आहे. सरकी तेल ७५ रुपये किलो, तर शाबू ७० रुपये किलोवर स्थिर आहे. साखरेच्या घाऊक बाजारात घसरण झाली असली तरी अद्याप किरकोळ बाजारात ४० रुपयेच साखरेचा दर आहे.
गुळाला पाच हजार रुपये दर!पावसाने थोडी उसंत दिल्याने गुºहाळघरांची धुराडी पेटू लागली असून, बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. रोज सरासरी पंधरा हजार रव्यांची आवक होत असून, जास्तीत जास्त दर ५०४० रुपये तर एक किलोच्या रव्याला प्रतिक्विंटल ५३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.