यवलूज : गतसाली ग्रामीण भागातील ग्रामदक्षता समित्या कोरोनाचा शिरकाव गावाच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी रात्र-दिवस डोळ्यांत तेल घालून एकदिलाने काम करीत होत्या; परंतु यावेळी कोरोनाबाधित व्यक्तींच्या कुटुंबाचा रोष पत्करायचा कोणी या कारणास्तव पन्हाळा तालुक्यातील सर्रास गावातील ग्रामदक्षता समित्या सदस्यांनी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवल्याने गावागावांतील चिंता वाढली आहे.
सध्या देशभर कोरोना विषाणूने सर्वांचीच झोप उडविलेली असून, शहरासंह ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत कोरोना विषाणूने परत एकदा नव्याने व्याप्ती वाढविली आहे. यावेळी कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या घरात अलगीकरण करण्यात आले असले तरी यातील बरेच रुग्ण हे बाधित असतानाही बेफिकीर वागत असून, त्यांचा अनेक ठिकाणी मुक्तसंचार सुरू असल्याचे भयावह चित्र बहुतांश गावात बघायला मिळत आहे.
एकीकडे शासन आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा पाडाव करण्याकामी राज्यभर कडक अंमलबजावणी करीत आहे; परंतु दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील ग्रामदक्षता समित्यांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आहे. गाव, वाडी वस्तीवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात गावपातळीवर कार्यन्वीत करण्यात आलेल्या कोरोना ग्रामदक्षता समित्यांनी नव्या जोमाने गावातील लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांसंबंधी परत एकदा कोरोनाच्या अटकावाकामी गावच्या वेशीवर आपले बस्तान मांडून बसने या घडीला तरी काळाची गरज बनली आहे.