कोल्हापूर : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. दातृत्वात सदैव अग्रेसर असा हा समाज आहे. ‘अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ’ने केलेल्या मागणीनुसार जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.‘जैन जागृती अभियान’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले, जैन समाजाच्या साधुसंतांच्या रक्षणासाठी, जैन मंदिर, जैन तीर्थांच्या रक्षणासाठी व समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र जैन महामंडळ ही काळाची गरज आहे. या समाजातील व्यापारी, उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे सरकार असून राज्यात विकासाच्या योजनांसाठी सरकार कधीही मागे हटणार नाही. जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी समाजाबद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल शिंदे यांचे आभार मानले. जैन विकास महामंडळच्या स्थापनेस पाठिंबा दिलेल्या राज्यातील १६० आमदार व २८ खासदारांच्या शिफारस पत्रासह तयार केलेला प्रस्ताव गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला.यावेळी संदीप भंडारी, नरेंद्र ओसवाल, कांतीलाल ओसवाल, राजेंद्र ओसवाल, जवाहर गांधी, अमृत शहा, प्रशम ओसवाल, हिंमत ओसवाल, महेंद्र ओसवाल, विकास अच्छा, प्रीती पाटील, अमित वोरा, प्रीतेश कर्नावट, मेघ गांधी, प्रीतम बोरा, राजेश ओसवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 1:27 PM