कोल्हापूर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे यंदापासून शालेय खेळाडूंची आॅनलाईन पद्धतीने नोंदणी घेतली जात आहे. यात ३ हजार ७२८ शाळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आॅनलाईन पद्धतीमुळे या सर्व शाळांतील खेळाडूंची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.दरवर्षी क्रीडा कार्यालय प्राथमिक ते माध्यमिकमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धांचे आयोजन करते. यात सुमारे ३९ क्रीडाप्रकार आहेत. सहभागी होणाऱ्या खेळाडूंचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे दरवर्षी हा कागदांचा प्रपंच सांभाळण्याची वेळ या कार्यालयावर येते. त्यामुळे ‘खेळ कमी अन् व्याप अधिक’ अशी स्थिती आहे.
प्रत्येक वर्षाचा हा विचार करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत क्रीडा कार्यालयाने ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने एक पाऊल टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. त्याअंतर्गत क्रीडा कार्यालयातर्फे होणाºया सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका आॅनलाईन पद्धतीने भरून घेतल्या जाणार आहेत. यंदा तालुका व जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.
यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील ३ हजार ७२८ शाळा एका क्लिकवर येणार आहेत. या नोंदणीत खेळाडूची जन्मतारीख एकदा नोंद केल्यानंतर तो खेळाडू शालेय स्पर्धांतून बाहेर जाईपर्यंत ती तशीच राहणार आहे. त्यामुळे वय कमी करून खेळाडू खेळविण्याच्या प्रकारास आळा बसणार आहे.
या माहितीमुळे वर्षभरात खेळलेल्या स्पर्धा, शाळा, खेळप्रकार, प्रावीण्य, बक्षिसे यांची सर्व माहिती त्यात असणार आहे. याकरिता त्या-त्या शाळांना युनिक क्रमांकही दिला जाणार आहे.क्रीडाशिक्षकांना याबद्दलचे प्रशिक्षणाचे धडेही देण्याचे काम क्रीडा कार्यालयातर्फे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्व शाळांना युडायस क्रमांकाने लॉगीन करून माहिती भरता येणार आहे. शाळेची नोंदणी, पासवर्ड, प्राथमिक नोंदणी, शुल्क भरणा, खेळाडूंची नोंदणी, सांघिक प्रवेशिका भरणे, आदी काम यात सुलभ करण्यात आले आहे.
‘डिजिटल इंडिया’अंतर्गत सर्व शाळा एका क्लिकवर याव्यात, या उद्देशाने आॅनलाईन पद्धत सुरू केली आहे. याची प्रात्यक्षिके जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दाखविण्यात आली आहेत. या पद्धतीमुळे खेळाडूंची माहिती, संकलन व जतन करणे सोपे जाईल.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर.