लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये गेल्या दहा वर्षांत दूध वाहतूक टँकरचे भाडे, त्याच्या ठेकेदारांची माहिती संचालिका शौमिक महाडिक यांनी मागितली आहे. या कालावधीत वाहतूक ठेक्यात कोणता आर्थिक गैरव्यवहार झाला? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
‘गोकूळ’च्या टँकर भाड्यापोटी दहा वर्षांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी १३४ कोटी कमावल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला होता. ‘गोकूळ’मध्ये चुकीचा कारभार झाला असेल तर गुन्हे दाखल करा, असे आव्हान शौमिक महाडिक यांनी दिले. त्यावर ‘सेवा नव्हे, मेवा खाण्यासाठीच महाडिकांकडून ‘गोकूळ’चा वापर, असा पलटवार मंत्री सतेज पाटील समर्थक तीन संचालकांनी केला होता. त्यानंतर बुधवारी शौमिक महाडिक यांनी ‘गोकूळ’च्या कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना पत्र लिहून दहा वर्षांतील टँकरची माहिती मागितली आहे.
टँकर भाड्यावरून आरोप-प्रत्यारोपामुळे ‘गोकूळ’च्या दुधाची पुन्हा घुसळण सुरू झाली आहे. मागील पाच वर्षांत साडेतीन वर्षे विश्वास पाटील हेच अध्यक्ष राहिल्याने टँकर भाड्याच्या माध्यमातून त्यांच्यासह नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शौमिका महाडिक यांचा आहे.
शौमिक महाडिक यांनी मागितली ही माहिती -
१) मागील दहा वर्षांत (२०००९-१० ते २०२०-२१) गोकूळ ते मुंबई, पुणे व सर्व चिलिंग सेंटरमधून किती दूध वाहतूक झाली व ती कोणकोणत्या वाहतूक ठेकेदारामार्फत झाली. त्यांना वर्षनिहाय किती भाडे आदा केले.
२) व्यंकटेश्वरा गुड्स मुव्हर्स प्रा. लि. ला दूध वाहतूक करताना इतर ठेकेदारांपेक्षा अथवा कराराशिवाय वेगळा दर किंवा सवलत दिली का?
३) व्यंकटेश्वरा गुड्स मुव्हर्स प्रा. लि. यांनी दूध वाहतूक केलेली बिले पाच दिवसांला आदा केली आहेत की इतर ठेकेदाराप्रमाणे आदा केली.
४) व्यंकटेश्वरा गुड्स मुव्हर्स प्रा. लि. यांनी दूध वाहतूक ठेेक्यांमध्ये २००९-१० ते २०२०-२१ मध्ये कोणता गैरव्यवहार केला आहे, असे लेखापरीक्षण अहवालात निर्देशित केले आहे का?
५) दूध वाहतूक दर हे टेंडर काढून ठरवले जातात का? कोल्हापूर, सांगली व इतर दूध संघाच्या मुंबई दूध वाहतुकीचे दर व अंतर किलोमीटरमध्ये किती आहेत.