कोल्हापूर : निवडणूक निरीक्षक नीलिमा केरकट्टा यांनी शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पाहणी करून सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन मतदान शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्रांच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्तासह कोरोना प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर राबवावेत असे आदेश त्यांनी दिले.केरकट्टा यांनी हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील कन्या विद्यामंदिर, शहरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, विद्यापीठ हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीरच्या तहसीलदार शीतल भामरे-मुळे उपस्थित होते.या पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा केरकट्टा यांनी घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, एम. आय. डी. सी.चे क्षेत्रीय अधिकारी धनंजय इंगळे हे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई यांनी तयारीचे ऑनलाईन सादरीकरण करताना विविध उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार असून, विनामास्क येणाऱ्या मतदारांनाही मास्क देण्यात येणार आहे.
अशा केल्या सूचना :
- मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे.
- आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा