शिरोली :
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी कलाकार महासंघाच्यावतीने पुणे-बंगळूर महामार्गावर गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करत महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केेला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. कलाकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही, असे आश्वासन कलाकार महासंघाला दिले होते. मात्र गणेशोत्सव काळात बेंजो कलाकारांनाही शासनाने परवानगी दिली नाही. कलाकारांची दीड वर्षांपासून उपासमार होत आहे. अनेक मंत्र्यांना निवेदने देऊनही आमची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे महामार्गावरच गणरायाची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्याचे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे म्हणाले, बेंजो आणि ऑर्केस्ट्रा कलाकारांनाही सरकारने मदत द्यावी. यावेळी कलाकार महासंघाने मागण्यांचे निवेदन हातकणंगले निवासी तहसीलदार दिगंबर सानप यांच्याकडे दिले.
यावेळी जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शोभा पाटील, करवीर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सोनल डोईफोडे उपस्थित होते.
फोटो : १३ शिरोली आंदोलन
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, अशी मागणी कलाकार महासंघाने हातकणंगलेचे निवासी तहसीलदार दिगंबर सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी कलाकार महासंघाचे अनिल मोरे, जयवंतराव वायदंडे, शोभा पाटील, सोनल डोईफोडे उपस्थित होते.