मुलीचा आंतरजातीय विवाह; रागातून सास-याने जावयाच्या अंगावर घातला टेम्पो, कोल्हापुरातील घटना
By उद्धव गोडसे | Published: March 1, 2023 03:59 PM2023-03-01T15:59:06+5:302023-03-01T15:59:51+5:30
तरुणीने दीड वर्षांपूर्वी गावातीलच तरुणाशी प्रेमविवाह केला होता
कोल्हापूर : मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी जावयासह त्याच्या मित्राला टेम्पोने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना राशिवडे बुद्रक (ता. राधानगरी) येथे मंगळवारी (दि. २८ फेब्रुवारी) घडली.
यात जावई प्रतीक तानाजी लुगडे (वय २३) आणि त्याचा मित्र संतोष तानाजी पोवार (२८, दोघेही रा. राशिवडे बुद्रुक) हे दोघे जखमी झाले असून, सासरा विजय मधुकर आजमाने (५०, रा. राशिवडे बुद्रुक) याला राधानगरी पोलिसांनी अटक केली.
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशिवडे बुद्रुक येथील लिंगायत समाजातील तरुणीने दीड वर्षांपूर्वी गावातीलच मराठा समाजातील प्रतीक लुगडे याच्याशी प्रेमविवाह केला. मुलीचा प्रेमविवाह मान्य नसल्याच्या रागातून तिचे वडील विजय आजमाने सतत लुगडे कुटुंबास त्रास देत आहेत.
मंगळवारी दुपारी प्रतीक लुगडे हा त्याची आई सुधा लुगडे आणि मित्र संतोष याच्यासह शेतात निघाला होता. त्यावेळी पाठीमागून टेम्पो घेऊन आलेला सासरा विजय आजमाने याने प्रतीक आणि संतोष यांच्या अंगावर टेम्पो घातला. या घटनेत दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असून, उपचारानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर जखमी प्रतीक लुगडे याची आई सुधा यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय आजमाने याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली.
जीवे मारण्याचा दुसरा प्रयत्न
विजय आजमाने याने जानेवारी २०२३ मध्ये जावई प्रतीक याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मुलगी आणि जावई यापैकी एकाला तरी संपवणारच अशी धमकी त्याने दिल्याचे जखमी प्रतीक याने पोलिसांना सांगितले.