इच्छुकांच्या नजरा कागलकडे--बिद्री कारखाना निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:28 PM2017-08-25T23:28:47+5:302017-08-25T23:31:37+5:30
कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे
जहॉँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क -कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे संभाव्य दोन्ही पॅनेलमधील इच्छुकांच्या नजरा कागलकडे लागल्या आहेत.
कागल तालुक्यातील निम्मी गावे म्हणजे ४३ गावांचे कार्यक्षेत्र या साखर कारखान्यासाठी आहे. एकूण सभासदांच्या २५ टक्के म्हणजे ५८ हजारांपैकी जवळपास १५,००० सभासद या गावातील आहेत, तर न्यायालयीन प्रक्रियेत जे ४००० सभासद पात्र ठरले त्यामध्ये १६०० सभासद कागल तालुक्यातील आहेत. कारण येथील पॅनेलचे नेतृत्व कागल तालुक्यातील नेतेमंडळींच पुढाकार घेऊन करतात.
या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे तत्त्वत: जाहीर केले आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात चर्चेच्या फेºया झाल्या आहेत. आता तालुक्यातून रणजितसिंह पाटील हे प्रशासकीय मंडळावर आहेत, तर समरजितसिंह घाटगे भाजपचे नेतृत्व करीत आहेत. यामुळे यांना देखील आता चर्चेत आणि पॅनेल रचनेत सहभागी व्हावे लागणार आहे.
तर प्रा. संजय मंडलिकांनी भाजप-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेची पॅनेल बांधणी सुरू केली आहे. संजयबाबा घाटगे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. कारण तालुक्यात त्यांनी प्रा. मंडलिकांच्याबरोबरीने काही निवडणुका लढविल्या असल्या तरी अंबरीश घाटगेंना शिक्षण सभापतिपद देण्यात मंत्री चंद्रकांतदादांनीच पुढाकार घेतला होता.
त्यामुळे या निवडणुकीसाठी आमदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे विरुद्ध प्रा. संजय मंडलिक- संजय घाटगे अशीच लढत होणार की यामध्ये काही बदल होणार? याकडे लक्ष वेधले आहे.