कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे चेअरमन संजय किर्लोस्कर यांनी शनिवारी केले.
कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना येथे ‘सीआयआय’तर्फे आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ या चारदिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.किर्लोस्कर म्हणाले, सांगली येथील किर्लोस्करवाडी येथे आमच्या पूर्वजांनी छोटासा उद्योग सुरू केला होता. तो वाढीला लागला. त्याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती. त्यातून कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला त्यांनी चालना दिली होती. त्यामुळे आज ही उद्योगनगरी बहरत आहे.
आता त्यात आम्हीही गुंतवणूक केली आहे. आमच्या उद्योगांनाही बळ आले आहे. आमचा उद्धार जसा झाला आहे तसाच तुमचाही होईल. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी परिसरांत नवनवीन उद्योग आहेत; पण ते वाढण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. तरी उद्योजकांनी अधिक गुंतवणूक करावी.
खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी शिक्षण, उद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्याच संस्कारांमुळे आज कोल्हापूरच्या उद्योग जगताचे नाव देशासह परदेशात झाले आहे. उत्तम हवा, मुबलक पाणी, सुपीक जमीन या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसºया क्रमांकावर आहे. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ कर्तबागारीच्या जोरावर येथील उद्योजक ांनी उद्योग जगत वाढविले आहे. कुशल तंत्रज्ञ, दर्जात्मक उत्पादन यांचा विचार करता कोल्हापुरात संरक्षण विभागाचा एक प्रकल्प उभा राहिल्यास त्याला लागणारे साहित्य येथील उद्योजक देतील. येत्या हिवाळी अधिवेशनात यासाठी मागणी करू. त्याकरिता उद्योजकांनी अशा प्रकल्पाचा सादरीकरण आराखडा तयार करावा. तो देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व राज्यमंत्री सुभाष भांबरे यांना सादर करू. प्रास्ताविकात सीआयआय साउथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी प्रदर्शन आयोजनचा हेतू विशद केला. ‘सीआयआय’चे साउथ महाराष्ट्र झोनलचे माजी अध्यक्ष मोहन घाटगे यांनी आभार मानले.
‘सीआयआय’चे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा, ‘आयआयएफ’चे दीपंकर विश्वास, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोतरे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, सौगत मुखर्जी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, पंचतारांकित एमआयडीसीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘एमएसएमईडीआय’चे राजीव गुप्ते, अभय दफ्तरदार, फौंड्री इक्विपमेंटचे रवींद्र चिरपुटकर, उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, ‘सीआयआय’चे वेस्टर्न रिजनचे मॅनेजर शौगट मुखर्जी, आदी उपस्थित होते.आज, रविवारी सकाळी दहा ते बारा यादरम्यान ‘ग्रोथ आॅपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटॅलिटी अॅँड टुरिझम सेक्टर’ व दुपारी २.३० ते ४ या दरम्यान ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल चेंजिंग द डायनॅमिक आॅपॉर्च्युनिटीज अॅँड वे फॉरवर्ड’ या, तर सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत ‘इंडियन वुमेन नेटवर्क’ या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.