इराणी टोळीचा चेन स्नॅचर गजाआड, साथीदार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:54 AM2021-03-30T11:54:13+5:302021-03-30T11:55:52+5:30
Crimenews Kolhapur- महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली.
कोल्हापूर : महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली.
मोहमद फिरोज इराणी (वय २१, रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, रेल्वे स्टेशन, सांगली. मूळगाव- जन्नतनगर, धारवाड, रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या चेन स्नॅचरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा दुसरा साथीदार दादू राजहुसेन इराणी (रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, सांगली) हा अद्याप फरारी आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी सकाळी इंदूबाई बाळासाहेब समुद्रे (वय ५०, रा. विक्रमनगर) या कामानिमित्त महाडिक वसाहत येते जाताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून नेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली दुचाकी जयसिंगपूर येथे घेऊन चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते उदगाव या मार्गावर सापळा रचला. त्यावेळी त्याच वर्णनाची दुचाकी घेऊन येणाऱ्यास पोलिसांनी अडवले.
दुचाकीबाबत खात्री करुन दुचाकीस्वार मोहमद इराणी याला ताब्यात घेतले. त्याने कोल्हापुरात महाडिक वसाहत येथे चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचे कबूल केले, त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा साथीदार दादू इराणी हा अद्याप फरारी आहे. त्याचा शोध सुरु आहे.
दुचाकी ठाणे येथून चोरली
अटक केलेल्या मोहमद इराणी याच्याकडे मिळालेली दुचाकी त्याने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.