रेशनवर आता लोह अन् आयोडिनयुक्त मीठ: नागपुरात विक्रीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:52 AM2018-07-20T11:52:30+5:302018-07-20T11:56:37+5:30
रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी (दि. १८) नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रेशनवर गहू, तांदळासोबतचा पाच वस्तू विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचे सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले होेते. भाजीपाला, छोटे गॅस सिलिंडर, खते, बी-बियाणे, पोस्ट तिकिटांचा यामध्ये समावेश होता. याची प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी सुरुवातही करण्यात आली आहे. यापूर्वी तूरडाळ रेशनवर देण्यात आली आहे.
आता मीठ ही रेशनवर देण्यास सरकारने परवानगी देऊन ते विक्रीसाठी ही उपलब्ध करून दिले आहे. नागपूरमध्ये बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन दुकानांतून मीठ विक्रीला सुरुवात करण्यात आली.
लोह व आयोडिनयुक्त मिठाच्या एक किलोच्या पॅकेटची विक्री होणार आहे. १४ रुपये प्रतिकिलो याची विक्री होणार असून त्यामध्ये दीड रुपया दुकानदाराला कमिशन मिळणार आहे. कार्डधारकांच्या संख्येनुसार प्रत्येक दुकानदाराला हे मीठ पुरविले जाणार आहे. खुल्या बाजारात एक किलो मिठाच्या पिशवीचा दर हा २० रुपये आहे. सर्वसामान्यांना माफक दरात मीठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
रेशनवर साखर, पामतेल, काडेपेटी, साबण, खोबरेल तेल यासह १४ वस्तू विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी रेशनदुकानदारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने काही वस्तू विकण्यास परवानगी देऊन सकारात्मक पाऊल उचलल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी इतर वस्तूंच्या विक्री परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून रेशनवर विक्रीसाठी जादा वस्तू वाढविण्याची मागणी होती. त्यानुसार सरकारने यापूर्वी तूरडाळ विक्रीला परवानगी दिली आहे. आता मीठ विक्रीला ही परवानगी दिली आहे. या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत असून अन्य वस्तूंच्या विक्रीसही लवकरच परवानगी द्यावी.
-रवींद्र मोरे, शहराध्यक्ष,
रेशन दुकानदार संघटना, कोल्हापूर