आयटी हब’ होण्याची कोल्हापुरात क्षमता : ललित कनोडिया--‘निर्यातवृद्धीस प्रोत्साहन’ विशेष परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:12 AM2017-12-13T01:12:09+5:302017-12-13T01:13:38+5:30
कोल्हापूर : मुंबई, पुणेनंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे क्षमता असल्याने ‘आयटी हब’ होऊ शकते.
कोल्हापूर : मुंबई, पुणेनंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे क्षमता असल्याने ‘आयटी हब’ होऊ शकते. अनेक मोठ्या कंपन्यांची कामे येथील ‘आयटी’ला साहाय्यभूत ठरणाºया घटकांकडून होऊ शकतात, असे प्रतिपादन इंडियन मर्चंट्स चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीचे (आयएमसी) अध्यक्ष व आयटी उद्योजक डॉ. ललित कनोडिया यांनी मंगळवारी येथे केले.
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीज व आयएमसी, वेसमॅकतर्फे आयोजित निर्यातवृद्धी प्रोत्साहन या विशेष परिसंवादात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या परिसंवादामध्ये त्यांनी ‘छोट्या शहरात आयटी उद्योगविस्ताराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर ‘आयएमसी’चे महाव्यवस्थापक अरविंद प्रधान, सहसंचालक ख्याती नरवणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शांताराम सुर्वे, संजीव शिवापूरकर, प्रकाश पुणेकर, वैभव सावर्डेकर, राजेंद्र मालू, महेश धर्माधिकारी, महेश सामंत, कल्लाप्पा पत्रावळे, अजित होनोले, शिवराज जगदाळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, या परिसंवादापूर्वी ‘कोल्हापूर चेंबर’ची वार्षिक सभा झाली. यात चेंबरची इचलकरंजी शाखा सुरू करणे, विविध क्षेत्रांतील मार्केटिंग करणे, आदी ठराव करण्यात आले.
‘मेक इन कोल्हापूर’ला संधी मिळावी
‘मेक इन कोल्हापूर’ची अनेक उत्पादने आहेत. त्यांच्यासह पर्यटन, आय. टी. उद्योग, व्यापारी, कोल्हापूर ब्रॅँडला संधी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापूरची विमानसेवा, नवे रेल्वे स्थानक, सुपरफास्ट रेल्वे या सुविधांसह येथे मोठा उद्योग येण्याची गरज असल्याची अपेक्षा या परिसंवादावेळी उद्योजक, व्यापाºयांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारतर्फे निर्यातीसाठी लागू केलेल्या अनेक प्रोत्साहनपर योजनांची माहिती उद्योजक आणि व्यापाºयांना नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना निर्यातीची बाजारपेठ मिळण्यासाठी निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जात आहे. कोल्हापुरातील वस्त्रोद्योग, लेदर, स्पोर्टस शूजसाठी कर्ज दिले जात आहे.
- समर्थ चतुर्वेदी, मुख्य प्रबंधक,
एक्झिम बँक
नव्या निर्णयानुसार निर्यातदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातदारांना चांगली संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा.
- सृष्टिराज अम्बस्था ,
उपसरव्यवस्थापक, एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन