आता अभिनय थांबविला तरी वाईट वाटणार नाही

By admin | Published: December 11, 2015 12:36 AM2015-12-11T00:36:33+5:302015-12-11T00:50:53+5:30

नाना पाटेकर : ‘नटसम्राट’मधील भूमिका हे माझे भाग्य; १ जानेवारीपासून प्रदर्शित

It will not be bad if you stop acting now | आता अभिनय थांबविला तरी वाईट वाटणार नाही

आता अभिनय थांबविला तरी वाईट वाटणार नाही

Next

कोल्हापूर : ‘नटसम्राट’ करणे हे माझे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले आहे. त्यामुळे यापुढे नाटक, चित्रपटातील अभिनय मी थांबविला तरी मला वाईट वाटणार नाही, अशी भावना अभिनेता नाना पाटेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
‘नटसम्राट’ हा चित्रपट १ जानेवारीपासून प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मेधा मांजरेकर, झी स्टुडिओेचे व्यवसाय प्रमुख निखिल साने उपस्थित होते. अभिनेते पाटेकर म्हणाले, नटसम्राट हे पहिल्यांदा रंगभूमीवर आले त्यावेळी मी वीस वर्षांचा होतो. डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावी अभिनयामुळे या नाटकाच्या डंखाची झिंग माझ्यात भिनली होती. त्यावेळी या नाटकातील सर्व स्वगते मला पाठ होती. नटसम्राट नाटक असते तर, काम केले नसते, कारण ते रक्त शोषून घेणार असून ते करण्यासाठी त्यातील सातत्य महत्त्वाचे आहे. त्यातील भूमिका मी उत्स्फूर्तपणे साकारली आहे. ही कलाकृती निश्चितपणे सर्वांना आवडेल. ‘नटसम्राट’ नाटक आणि चित्रपट यात फरक आहे. नटसम्राट चित्रपटात ‘आप्पासाहेब’, ‘कावेरीसह राम’ या तिन्ही बाजू दाखविल्या आहेत. प्रत्येकाने भूमिका आवडीने केली आहे.
महेश मांजरेकर म्हणाले, ‘नटसम्राट’ हा चित्रपट करताना मोठी कसरत करावी लागली. नाटकाची मूळ संहिता, गाभा कायम ठेवत चित्रपटाद्वारे ते प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील प्रमुख भूमिकेसाठी नाना यांच्याशिवाय दुसऱ्याचा विचार मनात आला नाही. आप्पासाहेबांसारखी ताकदीची भूमिका नाना यांनी साकारली आहे. मेधा मांजरेकर म्हणाल्या, कावेरी ही भूमिका चित्रपटात मी साकारली आहे. सुरुवातीला भीती वाटत होती; पण, नाना व महेश यांच्या पाठबळामुळे ते मला शक्य झाले.


आज मात्र उशीर झाला
नियोजित वेळेपेक्षा सव्वा तासभर उशिरा पत्रकार परिषद सुरू झाली. परिषदेच्या ठिकाणी येताच नाना पाटेकर यांनी माईक हातात घेऊन आजपर्यंत नाटकाचा पडदा कधी ८ वाजून ६० मिनिटांनंतर वर गेला नाही; पण, आज मात्र उशीर झाला, असे सांगत वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर विविध प्रश्नांवर नाना यांनी स्पष्ट आणि मिश्कीलपणे संवाद साधला.



कामाची नवी दिशा सापडली
आयुष्यातील ४२ वर्षे चित्रपटासाठी आणि त्यापेक्षा जास्त वर्षे नाटकाला दिली. आता ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करण्याची नवी दिशा सापडली असल्याचे अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘नाम’चे काम काही फार मोठे नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न असून, असा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.

Web Title: It will not be bad if you stop acting now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.