जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:47 PM2023-09-06T17:47:54+5:302023-09-06T17:48:17+5:30
निषेध मोर्चातही हजारोंचा सहभाग
अतुल आंबी
इचलकरंजी : जालना जिल्ह्यात मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडे, मालवाहतूक, रिक्षा, शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद राहिले. दरम्यान, शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तेथील आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने अनेकजण जखमी झाले. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. त्या अनुषंगाने येथील मराठा समाजाने बुधवारी इचलकरंजी बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी आपले व्यवहार, व्यवसाय बंद ठेवले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या चौकांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.
निषेध मोर्चाची सुरूवात बुधवारी सकाळी दहा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तेथून मुख्य मार्गावरून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मलाबादे चौक असा मार्गस्थ झाला. मोर्चा महात्मा गांधी पुतळा येथे पोहचल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांचे प्रतिनिधी अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, शिरस्तेदार काटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
वाहतूक बंदमुळे पायपीट
बंदमुळे येथील एस.टी.च्या २३८ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली.
कडक बंदोबस्त
आंदोलनासाठी एक अप्पर पोलिस अधीक्षक, २ उपअधीक्षक, ४ निरीक्षक, ३२ सहायक निरीक्षक, ३ स्ट्रायकिंग, गृहरक्षक दल, शहर वाहतूक शाखा कर्मचारी, निर्भया पथक असा कडक बंदोबस्त तैनात केला होता.