भराडी देवीच्या दर्शनासाठी जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 12:12 AM2016-02-26T00:12:58+5:302016-02-26T00:12:58+5:30

देवीच्या चरणी लाखो भाविक लीन

Janaragar for the darshan of Ferry goddess | भराडी देवीच्या दर्शनासाठी जनसागर

भराडी देवीच्या दर्शनासाठी जनसागर

Next

मालवण : आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आतुरलेले भाविक आणि लेकरांच्या भेटीची ओढ असलेल्या आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. गुरुवारी पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली. देवी भराडीच्या अगाध शक्तीच्या अभूतपूर्व संगमाचा ‘याची देही याची डोळा’ प्रत्यय भाविकांना आला. दरम्यान, आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे यात्रा सुरळीत पार पडली. यामध्ये पोलीस प्रशासन, ग्रामस्थ मंडळ, तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चोख नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते. यात्रेत अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये, यासाठीही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे राजकीय नेते, तसेच सिनेकलाकार यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.
आंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आठ रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. आज, शुक्रवारी मोडयात्रेने आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
‘व्हीआयपीं’ची मांदियाळी
आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी ५ ते १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलम राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार राम कदम, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक राजकीय नेते देवीचरणी लीन झाले.
सुलभ नियोजन : प्रशासन यशस्वी
राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आठ रांगा, तसेच मुखदर्शनाची सुविधा मंडळाकडून देण्यात आली होती. यासह ‘व्हीआयपी’, तसेच अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. एस.टी. प्रशासनाकडून विशेष १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या जत्रेत शेकडो पोलीस कर्मचारी, ३५ पोलीस अधिकारी अशी पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी तैनात झाली आहे. तसेच यावर्षी रेडिओ सुरक्षा प्रणालीचा वापर, आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, याबरोबरच आंगणेवाडी मंडळाच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुविधा पुरवल्या होत्या.
मालवणी खाजाची आवक वाढली
आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारच्या सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानांत मोठी गर्दी होती. यात्रेत शेकडो व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली.
स्पर्धांचा थरार
शिवसेना आयोजित खासदार विनायक राऊत यांच्यावतीने खासदार चषक शूटिंगबॉल स्पर्धा आणि मनसेचे परशुराम उपरकर यांच्यावतीने राजगड चषक कबड्डी स्पर्धेला भाविक, तसेच क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला. आंगणेवाडी यात्रेची धूम सुरू असताना क्रीडाप्रेमी स्पर्धांचा थरार अनुभवत होते. या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
 

Web Title: Janaragar for the darshan of Ferry goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.