कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता व चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या पर्यायाने राज्य शासनाच्या ताब्यात राहणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जयप्रभा स्टुडिओ वाचवून मी सिनेकलावंतांना व कोल्हापुरकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो. महापालिकेने खरेदीदारांना पर्यायी जागा द्यावी किंवा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू संपादनाच्या बदल्यात उर्वरीत जागेत बांधकामाला परवानगी देऊन टीडीआर द्यावा असे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महापालिकेला दिले आहेत.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दाेन वर्षापूर्वी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काेल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कला-चित्रपट व्यावसायिकांनी आंदोलन पुकारले होते. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर एनडी स्टुडिओ शासनाने ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असतील तर भालजी पेंढारकर यांच्या स्मृती जपणारा जयप्रभा स्टुडिओही शासनाने घ्यावा अशी मागणी कोल्हापुरातील कलाप्रेमींनी केली होती. अखेर दीड वर्षाने राज्य शासनाने यावर महत्वाचे पाऊल उचलले असून ३ तारखेला नगरविकास विभागाने काेल्हापूर महापालिकेला याबाबत पत्र पाठवले आहे.
जयप्रभा स्टुडिओ जाणार महापालिकेच्या ताब्यात, राजेश क्षीरसागर यांची माहिती
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 05, 2023 5:03 PM