लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठा संसर्ग पसरला आहे. कोरोनातून बरे झाले तरी ही गोष्ट लपवून ठेवणे अनेकजण पसंत करत आहेत. पण करनुर पैकी रामकृष्णनगर येथील पारीसा भीमराव जंगटे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला झालेला कोरोना लपवून ठेवला तर नाहीच. पण सर्वजण कोरोनामुक्त झाले म्हणून आनंदाप्रित्यर्थ गावातील प्रत्येक घरात मिठाईचा बाॅक्स दिला. प्रत्येकी अर्धा किलोची ही मिठाई जवळपास साडेतीनशे घरात देण्यात आली.
वंदुर (ता. कागल) येथील जंगटे कुटुंब करनुर पैकी रामकृष्णनगर येथे ऊसाचे गुऱ्हाळ चालवतात. आठ जूनला घरातील मुलगा कोरोना पाॅझिटिव्ह आला. नंतर सर्वच सदस्य पाॅझिटिव्ह आले. त्यामध्ये पारीसा जंगटे, त्यांची पत्नी, दोन मुले, दोन्ही सुना व दोन नातंवडे असे पाॅझिटिव्ह आले. पण मुलगा वगळता इतरांना फारशी लक्षणे नव्हती. गृह अलगीकरणात राहून ते बरे झाले तर मुलगाही कोल्हापुरात खासगी रूग्णालयात दाखल होऊन बरा झाला. सर्वजण कोरोनामुक्त झाले म्हणून आज दिवसभर मिठाईचे वाटप करण्यात आले.
कोट
माझ्या मुलाला कोरोना झाला हे स्पष्ट झाल्यावर आम्ही सर्वांनी तपासणी करून घेतली. सर्वचजण पाॅझिटिव्ह आलो. पण धीर सोडला नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. गुऱ्हाळ घरही बंद ठेवले. संपर्कातील सर्वांची तपासणी करून घेतली. लोकांच्या सदिच्छांमुळे सर्वजण कोरोनामुक्त झालो. म्हणून घरटी मिठाई वाटली आहे.
- पारीसा जंगटे, रामकृष्णनगर
फोटो कॅप्शन
कोरोनामुक्त झाल्याबद्दल जंगटे परिवाराच्यावतीने मिठाईचे वाटप करनुरचे माजी उपसरपंच इम्रान नायकवडी आणि जयसिंग घाटगे, भगवान शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.