Kolhapur: कागलला सीमा तपासणी नाका सुरू, अदानी समूहातील कंपनीचे व्यवस्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:45 PM2024-12-11T17:45:37+5:302024-12-11T17:46:12+5:30
सोयीसुविधांची वानवा
कागल : येथील महामार्गावर निर्माण केलेला खासगी तत्त्वावरील एकात्मिक सीमा तपासणी नाका मंगळवारी सकाळी सुरू झाला. विविध घटकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहने या नाक्यावर वळविण्यात आली. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्या व कर्नाटकातून येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांची तपासणी होणार आहे.
महामार्गावर बॅरिकेड लावून महामार्ग बंद केल्यानंतर ही वाहने दहा लेनच्या तपासणी नाक्याकडे वळविली. मंगळवारी पहिला दिवस असल्याने येथील कर्मचारी, अधिकारी तसेच वाहनचालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. दुचाकी वाहनधारकांना नेमक्या कोणत्या लेनमधून जायचे याचा उलगडा होत नव्हता. पहिल्या दिवशी विविध तपासण्यांमध्ये सूट दिल्याचे चित्र दिसत होते. खासगी प्रवासी वाहनांनाही या नाक्यावरून जावे लागल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसत होती. या ठिकाणी फक्त आरटीओशी संबंधित कागदपत्रांची तपासणी होत होती. काही दिवसांनंतर जीएसटी व अबकारी खात्याचीही कागदपत्रे येथे तपासली जाणार आहेत.
असे चालणार कामकाज
- अदानी उद्योग समूहातील महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेडमार्फत हा नाका चालविण्यात येत असून येथे कंपनीचे कर्मचारी संगणकीकृत नाक्यावर वाहनांचे वजन व अन्य कागदपत्रांची तपासणी करतील. त्यामध्ये त्रुटी आढळलेली वाहने येथे उपस्थित असणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याकडे पाठविली जातील व ते नियमानुसार पुढील कारवाई करतील, अशी कामकाज रचना आहे.
- ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत व त्रुटी नाहीत ती मालवाहतूक वाहने येथून सरळ पुढे जातील.
- हलके वजन असणाऱ्या मालवाहतूक वाहनांना प्रत्येकी ५३ रुपये, मध्यम वाहनांना ११२ रुपये, तर जड व अतिजड वाहनांना २१८ रुपये सेवा कर आकारला जाणार आहे.
- मोकळ्या वाहनांना तसेच मालवाहतूक सोडून अन्य वाहनांना कोणता सेवा कर आकारण्यात येणार नाही.
सोयीसुविधांची वानवा
या ठिकाणी थांबणाऱ्या वाहनांना तसेच चालकांना वेगवेगळ्या सेवासुविधा देण्यासाठी दुकानगाळ्यांची निर्मिती केली आहे. पण ते सुरू केले नव्हते. गाळेधारकांना वीज आणि पाणी दिलेली नाही. गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.