कन्हैय्याकुमार यांच्या सभेला परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 01:40 PM2021-02-19T13:40:28+5:302021-02-19T13:42:02+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याच्या सायंकाळी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याच्या सायंकाळी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी बुधवारी या सभेस परवानगी दिल्यावर घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन ही सभा दसरा चौकात उघड्यावर होणार असल्याची माहिती गिरीश फोंडे यांनी दिली होती. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते, तर आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, जेएनयूमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आता कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात रोग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कन्है्य्याकुमारच्या सभेला परवानगी नाकारली आहे. ही सभा दसरौ चौक मैदान येथे उघड्यावर मैदानात घेण्यात येत असल्याने याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेचे कारण देउन या सभेला परवानगी नाकारली असून ती बंदिस्त जागेत आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप पवार, एस. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, मेघा पानसरे, रसिया पडळकर यांनी पुढाकार घेऊन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविशकुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान नियोजित वेळेत होणार आहे. त्याची घोषणा अगोदरच झाली आहे.
भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम ६ ते ८ या वेळेत आहे. शाहू स्मारक भवनमध्ये त्याचे लोकांसाठी थेट प्रक्षेपणही आयोजित केले आहे. रविशकुमार ६ ते ७ अशी एक तास मांडणी करणार आहेत.