कसबा बावडा : कसबा बावडा परिसरात रविवारी सायंकाळच्या वेळी पावसाचे चांगलेच वातावरण झाले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे बळिराजा चिंतातुर झाला.
परिसरात दुपारी चारनंतर ढग दाटून आले. आकाश काळेकुट्ट झाले होते. हा पाऊस केव्हा आणि किती कोसळेल याचा नेम नव्हता. त्यामुळे दारात वाळत घातलेले उन्हाळी पदार्थ भराभरा गोळा करून घरात नेण्याची धांदल सुरू होती. सायंकाळी सहा वाजता केवळ दहा मिनिटे पावसाचे तुरळक थेंब पडले. त्यानंतर मात्र हवेत आणखी उष्णता वाढली. बराच वेळ वीजही खंडित झाल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक आणखी हैराण झाले.
दरम्यान, कसबा बावड्याच्या परिसरात सध्या उसाच्या मशागतीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसाला रासायनिक खतांचा डोस देऊन भरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. रविवारी पावसाचे वातावरण झाल्याने तो सुखावला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने त्याची घोर निराशा झाली.