एव्हरेस्ट चढाईला निघालेली ‘कस्तुरी’ही ‘महामॅरेथॉन’मध्ये धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:56 PM2019-12-27T12:56:42+5:302019-12-27T13:40:22+5:30
हिमालयासह सह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर करणारी आणि २०२० च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड झालेली पहिली करवीरकर अठरा वर्षीय कस्तुरी सावेकर हीसुद्धा ‘ लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन धावणार आहे.
कोल्हापूर : हिमालयासह सह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर करणारी आणि २०२० च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड झालेली पहिली करवीरकर अठरा वर्षीय कस्तुरी सावेकर हीसुद्धा ‘ लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन धावणार आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दऱ्याखोऱ्यांत फिरणाऱ्या कस्तुरीने आतापर्यंत गिर्यारोहणाच्या १३७ मोहिमा यशस्वीरीत्या सर केल्या आहेत. यात सह्याद्रीतील सर्वांत उच्च साल्हेर किल्ला, सालोटा, मोरामुल्हेर हरगड, हरिश्चंद्रगड, नळीची वाट, अवघड समजला जाणारा अलंग मदन कुलंग, हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग येथील ११९२९ फूट उंचीचे संदकफू शिखर सर केले आहे.
याबरोबर तिने जून २०१८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग व अलाईड स्पोर्टस, मनाली या संस्थेतून कोर्स पूर्ण केला आहे. यासाठी तिने १५ हजार ७०० फुटांवरील ‘क्षितीधार’ हा बेस कॅम्प पूर्ण केला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये तिने ३५० फुटांवरील अवघड कातळधार धबधबाही रॅपलिंगद्वारे सर केला आहे.
सह्याद्रीच्या रांगेतील अत्युच्च शिखर कळसूबाई व हरिश्चंद्रगड हाही सर केला आहे. हजार फुटांवरील ‘लिंगाणा’ही सर केला आहे. अत्यंत कठीण समजली जाणारी २१ हजार २४६ फूट ‘माऊंट मेरा पीक मोहीम’ १२ दिवसांत पूर्ण केली आहे.
ऊर्जा देणारी महामॅरेथॉन
‘लोकमत’ समूहातर्फे घेतली जाणारी महामॅरेथॉन सर्वच खेळांतील खेळाडूंना ऊर्जा देणारी आहे. ही मॅरेथॉन ही माझ्यासाठी खास मोहीमच आहे. त्यात मीही सहभागी होऊन धावणारच आहे. त्यामुळे तुम्हीही मागे न राहता सहभागी व्हावे.
- कस्तुरी सावेकर, गिर्यारोहक