सरुड : जिल्हा बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच गटात चुरशीने मतदान झाले. याच दरम्यान शाहूवाडी येथील मतदान केंद्रावर एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. शाहूवाडी तालुक्यात संस्था गटात विद्यमान संचालक सर्जेराव पाटील व मानसिंग राव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर सिंह गायकवाड यांच्यात काटा लढत होत आहे. सकाळ पासुनच मतदान केंद्रावर चुरस दिसून येत होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील - पेरीडकर हे शाहूवाडी येथील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते. यावेळी मतदान केंद्रावर कर्णसिंह गायकवाड, शिवसेनेचे जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, माजी उपसभापती विष्णू पाटील - सोनवडेकर, महादेवराव पाटील - साळशीकर, प. स. सदस्य अमरसिंह खोत हे ही उपस्थित होते. तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना फोटोसाठी एकत्र उभा राहण्याची विनंती केली.
पत्रकारांच्या या विनंतीस मान देत व थोड्या वेळासाठी राजकारण बाजुला ठेवत शाहूवाडीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील - पेरीडकर यांच्यासह मतदान केंद्रावर उपस्थित आपल्या कार्यकर्त्यांसह एकत्र येत फोटो साठी पत्रकाराना पोझ दिली. फोटोसाठी का होईना किमान शाहूवाडीतील एकमेकांचे कट्टर विरोधक व त्यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याची चर्चा मतदान केंद्रावर सुरु होती.