वाकरेतील तळ्यात दडलाय पौराणिक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:30+5:302021-05-11T04:25:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : वाकरे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी उत्खनन करीत असताना पौराणिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी उत्खनन करीत असताना पौराणिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या तळ्याचा शोध लागला आहे. अत्यंत रेखीव व आधुनिक तंत्रज्ञानालाही मागे टाकणारी रचना असलेल्या तळ्याचे बांधकाम जांभ्या दगडात केले आहे.
या तळ्याचे बांधकाम १२व्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नदी घाटाकडे जाणाऱ्या पाणंदीला लागूनच हे तळे आहे. येथे तळ्याच्या पाऊलखुणा होत्या. पण प्रचंड गाळ व पानकणसाने ते झाकोळून गेले होते. अनेक वेळा तेथील गाळ काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. याबाबत वयोवृध्द लोकांनाही माहिती नसल्याने केवळ ओबळढोबळ तळे असावे अशीच ग्रामस्थांचा समज होता.
पण वाकरे गावाला सौरऊर्जा प्रकल्पातून निधी मंजूर झाला आणि सरपंच वसंत तोडकर यांनी या तळ्यातील गाळ काढून येथे सौर पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतला. येथील गाळ उपसण्यास सुरुवात केल्यानंतर दहा फुट खोलवर रेखीव व चकाकणाऱ्या जांभ्या दगडाचे बांधकाम असणाऱ्या पायऱ्या लागल्याने गाळ काढण्याचे काम अत्यंत सावधपणे सुरू केले. दक्षिण व पश्चिमेला असणाऱ्या पायऱ्या २५ फुट खोल रिकामे करण्यात आले आहे. उभ्या १४ ते १५ पायऱ्या तेथून खाली सात फुट बांधकाम आहे. अजून खाली गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे या तळ्यात पौराणिक ठेवा व इतिहास दडला असल्याने पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष देऊन संशोधन करण्याची गरज आहे.
तळ्यात इंटेक व आऊटलेटचे तंत्रज्ञान
या तळ्यात सभोवती इंटेक व आऊटलेटचे तंत्रज्ञान वापरल्याचे समोर आले आहे. १५ व्या पायरीच्या खाली १० फुटाच्या अंतराने ५ फुट बाय सहा फुट मोठी रिकामी जागा राखण्यात आली आहे. तळ्याच्या पायरीसाठी वापरण्यात आलेला दगड जांभा चकाकणारा आहे व जिल्ह्यातील मनिकर्णिका कुंड, जोतिबा वरील यमाई तळे, कात्यायनीचे तळे, कोटीतीर्थ तलावाला साधर्म्य असणारे बांधकाम आहे .पण याबाबत ग्रामस्थांना पौराणिक माहिती नाही.
प्रतिक्रिया
येथे सौरऊर्जा प्रकल्प पॅनेल उभा करण्यासाठी चँनेल उभा करणार होतो. पण जसजसा गाळ निघेल तशी जांभ्या दगडाच्या पायरी लागली आणि उत्सुकता म्हणून युवकांच्या मदतीने काम सुरू केले. पौराणिक तळे सापडले आहे. १५ हजार ट्रॉली गाळ काढला आहे. अजून काम करायला मोठा निधी लागणार आहे
वसंत तोडकर , सरपंच
फार वर्षांपासून हे तळे गाळ व पानकणसात गडप झाले होते. तळे आहे पण एवढे आखीव रेखीव तळे असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. या तळ्यात मंदिर असल्याचे बोलले जाते.
एस .ए. पाटील निवृत्त प्राध्यापक
फोटो
वाकरे ता. करवीर येथील जांभ्या दगडातील रेखीव तळ्याचा उघडा झालेला भाग.