कोडोली पोलिसांनी रात्र काढली भर पावसातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:10+5:302021-05-18T04:25:10+5:30
या घटनेची चर्चा दिवसभर वारणा परिसरात सुरू होती. कोल्हापूर-सांगली हे दोन जिल्हे जोडणाऱ्या अमृतनगर-चिकुर्डे मार्गावरील वारणा नदीवर कोडोली पोलिसांनी ...
या घटनेची चर्चा दिवसभर वारणा परिसरात सुरू होती. कोल्हापूर-सांगली हे दोन जिल्हे जोडणाऱ्या अमृतनगर-चिकुर्डे मार्गावरील वारणा नदीवर कोडोली पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याने कोडोली पोलिसांनी जिल्हाबंदी मार्गावरील दोन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेंद्र पाटील, सागर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
रविवारी दिवसभर वादळी वारा व पाऊस सुरू होता. याच दिवशी लॉकडाऊन जाहीर झाल्याने पोलिसांना ठिकठिकाणी पावसातच बंदोबस्त करावा लागला; परंतु मुख्य नाकाबंदी असणाऱ्या चिकुर्डे येथील वारणा नदी पुलावर मात्र पोलिसांना रात्रभर भर पावसातच बंदोबस्त करावा लागला. या ठिकाणी कोणतेही घर अथवा वस्ती नाही. वस्ती आहे ती लांब पल्ल्यावर आहे, पण पोलिसांनी आहे त्या ठिकाणी झाडांचाच आधार घेऊन बंदोबस्त केला.
कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद व पी.एस.आय. नरेंद्र पाटील यांनी या घटनेचे गांभीर्याने घेऊन चिकुर्डे येथे सोमवारी सकाळी नाकाबंदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने निवाऱ्यासाठी ताडपदरीचा तंबू उभा केला. त्यामुळे आता पोलिसांना आधार मिळाला.