कोल्हापूर / कसबा बावडा : शेजाऱ्यांच्या घरावरील टेरेसवर कपडे वाळत घालताना ३३ हजार मेगावॅट विद्युत वाहिनीचा धक्का असून शाळकरी मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली. उमा विलास लाखे (वय १२, रा. भगतसिंग वसाहत, कसबा बावडा) असे तिचे नाव आहे. तिला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.अधिक माहिती अशी, विलास काशीनाथ लाखे हे महानगरपालिकेकडे सफाई कामगार म्हणून नोकरी करतात. त्यांची पत्नी मंदा ह्या धुण्या-भांड्याची कामे करतात. या दोघांना पाच मुली व एक मुलगा आहे. एका मुलीचा विवाह झाला आहे. उमा ही सहावीमध्ये शिकते. त्यांच्या घरासमोर सुवर्णा शिंदे यांनी दुमजली घर बांधले आहे. त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर शुभांगी प्रकाश कांबळे ह्या भाड्याने राहतात.
इमारतीच्या वरती टेरेस आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास उमा लाखे ही कांबळे यांच्या घरी गेली. यावेळी शुभांगी कांबळे यांनी तिला टेरेसवर धुतलेले कपडे वाळत घालण्यास सांगितले. कपड्यांची बादली घेऊन ती टेरेसवर गेली. याठिकाणी कपडे वाळत घालत होती. उमा ओले कपडे वाळत घालत असताना विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जागेवरच बेशुद्ध पडली. यावेळी स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला.
या आवाजाने आजूबाजूचे लोक बाहेर पळत आले त्यांना शिंदे यांच्या टेरेसवर काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाली. कारखाना प्रशासनाला कळवून तत्काळ या परिसरातील वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर टेरेसवर जावून पाहिले असता उमाचे संपूर्ण अंग जळाले होते. ती बेशुद्धावस्थेत निपचित पडली होती.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. सुमारे ९० टक्के ती भाजली असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी शाहूपुरीचे पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे, वीज मंडळाचे शहर अभियंता एस. बी. शेळके यांनी भेट दिली.नातेवाईकांचा आक्रोशडोळ्यासमोर घडलेल्या घटनेने या परिसरातील नागरिकांना धक्काच बसला. पोटच्या मुलीचे संपूर्ण अंग भाजलेले पाहून आई-वडील, नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.घरमालकाचा हलगर्जीपणाबिरजे पाणंद परिसरात नागरी वस्ती होण्यापूर्वी वीज मंडळाची ३३ हजार मेगावॅट विद्युत वाहिनी बापट कॅम्प येथून कसबा बावड्याकडे गेली आहे. या वाहिनीच्या खाली किंवा आजूबाजला बांधकाम करता येत नाही, असा नियम आहे; परंतु काही लोकांनी या वाहिन्यांच्या खाली दुमजली घरे बांधली आहेत. सुवर्णा शिंदे ह्या महापालिकेमध्ये नोकरी करतात. वर्षापूर्वी घर बांधताना त्यांना व शेजारी लोकांना वीज मंडळाने घरे बांधू नये, अशी नोटीस बजावली होती; परंतु शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष करून दुमजली घर बांधले.
आठ महिन्यांपूर्वी या इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून कामगार होरपळला होता. त्यानंतरही या कुटुंबाने कोणतीही दक्षता घेतली नाही. या घटनेनंतरही वीज मंडळाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली होती. शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महापालिका बांधकाम विभागाने घरे बांधण्यास परवानगी दिली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्यांदा घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.