कोल्हापूर : अखेर आबदार शिवाजी पूल कामकाजातून कार्यभारमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:35 PM2018-07-18T17:35:28+5:302018-07-18T17:38:19+5:30
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली.
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली. तत्पूर्वी कृती समितीने कांडगावे यांना तीन तासांचा घेराओ घातला होता.
शिवाजी पुलाचे उर्वरित काम सुरू असताना, त्यामध्ये वरिष्ठांना त्यांनी चुकीचा अहवाल देऊन कामात तांत्रिक अडचणी निर्माण केल्या. याबद्दल कृती समितीने आबदार यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन पुकारले होते. त्यानुसार आंदोलकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची भेट घेतली. यात आबदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर कांडगावे यांनी ‘मला निलंबन करण्याचे अधिकार नाहीत,’ असे समितीला सांगितले.
यावर समाधान न झाल्याने समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा ते दुुपारी दोन वाजेपर्यंत असे तीन तास कांडगावे यांच्या दालनात ठिय्या मारत त्यांना घेराओ घातला. अखेर कांडगावे यांनी वरिष्ठ मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही आंदोलकांना मला त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.
आंदोलकांतर्फे समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी ‘हा पोरखेळ थांबवा; लाखो लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे,’ असे बोल सुनावत फोन बंद करून कार्यालयास टाळे ठोकण्याची भूमिका घेतली.
या भूमिकेमुळे कांडगावे यांनीही नरमाईचे धोरण स्वीकारत, ‘कामकाज काढून घेण्याचे अधिकार मला आहेत. त्याप्रमाणे मी कारवाई करतो,’ असे सांगितले. त्यानंतर आंदोलकांनीही ‘तसे लेखी पत्र द्या; अन्यथा सायंकाळपर्यंत दारात ठिय्या मारतो,’ असेही सुनावले.
यावेळी कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी आबदार यांच्यावर कारवाईच्या पत्राची प्रतही दिली. यात आबदार हे पूर्वसूचना देऊनही बैठकीस अनुपस्थित राहिले नाहीत. तसेच कार्यालयीन पत्रव्यवहार व पुलासंबंधी इतर माहिती सोशल मीडियावर टाकून जनतेमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण केला. याद्वारे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ७ व ८ चा भंग केला. त्यानुसार पुलाचे कामकाज काढून घेत असल्याचा आदेश दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी सतीशचंद्र कांबळे, बाबा पार्टे, किशोर घाटगे, चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, विजय करजगार, अशोक भंडारी, फिरोजखान उस्ताद, तानाजी पाटील, जयकुमार शिंदे, दिलीप माने, कुमार खोराटे, रणजित काकडे, महादेव आयरेकर, सचिन बिरंजे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.