कोल्हापूर : शेती पंप वीज व पाणी पट्टी दर वाढीविरोधात मंगळवारी (दि. २७) मंत्रालयावर काढण्यत येणाऱ्या धडक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (दि. २५) सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केला आहे. अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील -किणीकर व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील -भुयेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.महावितरणने ३ ते १०० एच. पी. विद्युत पंपाच्या युनिट दरात तब्बल १५४ टक्के तर उपसा जलसिंचन योजनाच्या दरात २७४ टक्के वाढ केली. याविरोधात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ नोव्हेंबर २०१७ ला मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात काहीतरी तोडगा काढू, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित केले. पण काहीच निर्णय न घेता शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे.आता धडकेनंतरच चर्चा!प्रा. एन. डी. पाटील यांच्या उभ्या आयुष्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांच्या मागणीकडे सहानुभूतीपुर्वक बघितले जायचे. पण भाजप सरकारने खोट्या आश्वासनाच्या माध्यमातून एका ज्येष्ठ नेत्याचा अपमान केला आहे. त्यामुळे आता मंत्रालयावर धडक देऊनच चर्चा होईल, असे विक्रांत पाटील यांनी सांगितले.