सचिन भोसले
कोल्हापूर : गुजराथ, राजस्थान, दिल्ली, लखनौसह उत्तर भारतात विशेषत: उत्तरायणात येणारी मकर संक्रातीमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात हा महोत्सव व्हावा. याकरीता प्रयत्नशील व पतंगांच्या रंगीबेरंगी दुनियेत रममाण होणारे शिवानंद तोडकर यांच्याकडे बटरफ्लाय, ते वटवाघूळ, विमान अशा एक ना अनेक पतंगांचा संग्रह आहे. संक्रांतीनिमित्त तोडकर यांनी फोल्डींगचे पतंग उडवून शनिवारीही हा आनंद द्विगुणीत केला.मोबाईलच्या फसव्या मोहजालामुळे पारंपारिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. हे खेळ म्हणजेच पुर्वी लहानग्यांसाठी मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठीचे खेळ म्हणून पाहीले जात होते. कारण या खेळात मन एकाग्र नसेल तर अन्य प्रतिस्पर्धी आपल्यावर मात करीत असे. हाच नियम पतंग उडविणे, काटाकाटीमध्ये लागू होतो. मात्र, पतंग महोत्सव अथवा पतंगांंची काटाकाटी स्पर्धा दुर्मिळ होत चालली आहे.
उत्तर भारतात पतंग महोत्सव आजही दिवाळी दसऱ्यासारखा साजरा केला जात आहे. पण महाराष्ट्र केवळ पुणे, मुंबईमध्ये मोजक्याच ठिकाणी होतो. त्यातही सातत्य नसते. विशेषत: उत्तरायणामध्ये मकर संक्रांतीला पतंग महोत्सव केला जातो.
या काळात पंतग उडविण्यासाठी पोषक वातावरण, वारे असते. मात्र, पंतग उडविणे काळाच्या पडद्याआड होऊ लागले आहे. केवळ चौकौनी कागदी पतंग उडविणे म्हणजे पतंगमहोत्सव नव्हे तर विविध रुपात पंतग तयार करुन ते उडविले जातात. ही परंपरा उत्तर भारतात आजही जपली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरातील शिवानंद तोडकर हे सातत्याने अहमदाबाद येथे केवळ पतंग महोत्सव पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी जातात. हीच परंपरा कोल्हापूरातही सुरु व्हावी, याकरीता ते प्रयत्नशील आहेत. दर मकर संक्रांतीला ते फॅन्सी पतंग गुजराथहून मागावून घेऊन वर्षभर संग्रहीत करतात व मकर संक्रांतीला ते स्वत:च्या टेरेस किंवा रंकाळा तलाव परिसरात उडवितात. त्यांचा हा क्रम वर्षानुवर्षे सुरु आहे.
चीनी मांजा व अन्य मांजा हे पक्षी, प्राणी , मनुष्यांना कापतात. प्रसंगी गळ्याच्या नसा कापून मृत्यु किंवा जखमी झालेल्या नागरीकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ते विशेषत: ते पतंग उडविण्यासाठी पोते शिवण्याचा धागा वापरतात.
हे पतंग संग्रहातप्लॅस्टिक कॅरीबॅगपासून बनविलेला स्केलेटीन पतंग, बटरफ्लाय, शार्क मासा, वटवाघूळ, आॅक्टोपस, गरुड, एअरोप्लेन, स्लेडर गरुड, असे एक ना अनेक कापडी फोल्डींगचे वर्षानुवर्षे टिकणारे परदेशी पतंग तोडकर यांच्या संग्रहात आहेत.
पारंपारीक खेळ मोबाईलच्या अति वापराने दुर्मिळ होत चालले आहेत. त्यात पुन्हा एकदा त्या खेळांना प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यात पतंग, भोवारा, विटी दांडू हे खेळ मनाची एकग्रता वाढविणारे आहेत. त्यातील एक भाग असणारा पतंग ही गुजराथ, मुंबई, पुणे सारखा पतंग महोत्सव रुपाने कोल्हापूरातही व्हावा.- शिवानंद तोडकर,पतंगप्रेमी