कोल्हापूर : डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा : शौमिका महाडिक, प्रत्येक गुरुवार ‘डास संहारक दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:12 PM2018-06-20T13:12:55+5:302018-06-20T13:17:13+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरुवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरुवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथे दिले.
कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरुवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरुवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथे दिले.
जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आयोजित जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती आरोग्य सभापती सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे, आदींची होती.
यावेळी एकात्मिक डास निर्मूलन मोहिमेचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाले. महाडिक म्हणाल्या, जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादूर्भाव डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेने डेंग्यू प्रतिबंधासाठी गाव घटक धरून नियोजन केले आहे.
गाव पातळीवर डेंग्यू प्रतिबंधासाठी समिती स्थापन केली असून, गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या सक्रिय योगदानातून डास प्रतिबंधक मोहीम अधिक तीव्र केली जात आहे.
सर्जेराव पाटील यांनी, एकात्मिक डास निर्मूलन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. स्वच्छता, दक्षता याबरोबरच आरोग्य शिक्षण या बाबींना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून गावातील पाण्याच्या टाक्या महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
डॉ. खेमनार म्हणाले, डास निर्मूलनासाठी जिल्ह्यात डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला असून, जिल्ह्यात ४२० गप्पी माशांची पैदास केंद्रे कार्यान्वित केली आहेत.
मोहिमेचा दर आठवड्याला आढावा
एकात्मिक डास निर्मूलन मोहिमेस सर्व यंत्रणांनी सक्रिय योगदान द्यावे, परस्पर समन्वय राखून ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश देऊन जिल्हा स्तरावर डास संहारक टीम कार्यान्वित केली असून या मोहिमेचा दर आठवड्याला आढावा घेऊन तिला गती दिली जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.