कोल्हापूर : बसवेश्वरांच्या छायाचित्रासह लहरणारे भगवे झेंडे, ‘मी लिंगायत, लिंगायत स्वतंत्र धर्म’ लिहिलेल्या आणि डोक्यावर परिधान केलेल्या टोप्या, गळ्यात घालण्यात आलेले भगवे स्कार्फ ‘जगनज्योती महात्मा बसवेश्वर की जय,’ ‘मी लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’च्या घोषणा, लाखो शरण-शरणींची उपस्थिती आणि ‘भारत देशा, जय बसवेशा’चा गजर असे अनोखे वातावरण रविवारी दसरा चौकाने अनुभवले.अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत स्वतंत्र धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी म्हणून रविवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. त्याआधी दसरा चौकामध्ये सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. या मोर्चाचे प्रमुख केंद्रच दसरा चौक असल्याने साहजिकच या ठिकाणी वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूला भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी दहानंतर लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने दसरा चौकामध्ये जमू लागले. तिथे येताच ‘मी लिंगायत’ लिहिलेल्या टोप्या डोक्यावर चढू लागल्या. व्यासपीठावर एकेका मान्यवराचे आगमन होऊ लागले.पाठिंब्याची भाषणे सुरू झाल्यानंतर घोषणा वाढू लागल्या. ‘बसवपीठा’वरून आवाहन केल्यानंतर हात वर करून घोषणांच्या आवाजाची पातळी वाढू लागली. बसवेश्वरांचे चित्र असलेले भगवे झेंडे लहरू लागले. त्यामुळे मोर्चा अधिक भारदस्त वाटू लागला.
कडक उन्हातही महिला आणि पुरुष, युवक-युवतींनी रस्त्यातच बैठक मारली होती. वक्त्यांच्या भाषणाला टाळ्या पडत होत्या. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही. दिलेल्या सूचनांचे पालन करीत सर्वांनीच शिस्तपालनाचे दर्शन या ठिकाणी घडविले.
बसवाण्णा, अक्कमहादेवी, चन्नबसवाण्णा‘बसवपीठा’च्या एका बाजूला तीन मुलामुलींनी केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. पेठवडगाव येथील शिवप्रसाद लंबे हा बसवाण्णांच्या वेशात, तर भक्ती पाटील व आयुष पाटील यांनी अक्कमहादवी व चन्नबसवाण्णा यांची वेशभूषा केली होती. हे तिघेजण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले होते.
हा अमुचा, हा अमुचा‘बसवपीठा’च्या मागे उभारण्यात आलेल्या मोठ्या फलकावर महात्मा बसवण्णा यांचे वचन लिहिण्यात आले होते. ‘हा कोणाचा, तो कोणाचा असे म्हणू नये; हा अमुचा, हा अमुचा असेच म्हणावे,’ या वचनाचा उल्लेख करण्यात आला होता. मध्यभागी बसवेश्वरांचा मोठा पुतळा ठेवण्यात आला होता. तेथे नमस्कार करूनच वक्त्यांनी आपल्या भाषणांना सुरुवात केली.
अनेक ग्रामपंचायतींचे ठरावप्रजासत्ताकदिनी झालेल्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माला संवैधानिक दर्जा मिळावा, असा ठराव केला होता. अशा गावांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली. अनेक गावांनी अशा स्वरूपाचे केलेले ठराव संयोजकांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पाठिंबा दिलेल्या मान्यवरांचीही नावे जाहीर करण्यात आली.
जागेवर पाणी पोहोचभर दुपारी नागरिक रस्त्यांवर बसून होते. मात्र स्वयंसेवकांनी प्रत्येकाला जागेवर पिण्याच्या पाण्याचे पाऊच पोहोच केले.
फोटो आणि सेल्फीमोठ्या संख्येने लिंगायत महिला आणि पुरुष या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरला होता. त्यामुळे सर्व वयोगटांतील सर्वांनीच या मोर्चाची आठवण राहावी यासाठी फोटो तसेच सेल्फी काढून घेतले.