कोल्हापूर : अंध व्यक्तींनी ब्रेल भाषा आत्मसात केली पाहिजे : अंजली निगवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:04 PM2019-01-14T18:04:40+5:302019-01-14T18:06:02+5:30
लुई ब्रेल यांनी संशोधन केलेली बिंदू स्पर्श भाषा ही दृष्टिबाधितांसाठी वरदान ठरली आहे. संगणकीय युगात ही ब्रेल भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निगवेकर यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले. अध्यक्षस्थानी डॉ. चेतन खारकांडे होते.
कोल्हापूर : लुई ब्रेल यांनी संशोधन केलेली बिंदू स्पर्श भाषा ही दृष्टिबाधितांसाठी वरदान ठरली आहे. संगणकीय युगात ही ब्रेल भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निगवेकर यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले. अध्यक्षस्थानी डॉ. चेतन खारकांडे होते.
यावेळी सक्षम संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ब्रेल लेखन आणि वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण येथील नूतन मराठी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. निगवेकर आणि डॉ. चेतन खारकांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निगवेकर बोलत होत्या.
प्रास्ताविकात सक्षमचे अध्यक्ष गिरीश करडे यांनी लुई ब्रेल यांचा संपूर्ण जीवनपट सांगितला. मोठ्या गटात गोखले कॉलेजच्या विशाखा लांडगे हिने वाचन स्पर्धेत, तर गोखले कॉलेजच्याच पूनम पुंजारा हिने लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. लहान गटात विद्यापीठ हायस्कूलच्या सुशांत दाशाळ याने वाचन स्पर्धेत, तर विद्यापीठ हायस्कूलच्याच वैष्णवी हजाम हिने लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचा निकाल सारिका करडे यांनी जाहिर केला. सूत्रसंचालन भक्ती करकरे यांनी केले, तर विनोद ओसवाल यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. अंजली निगवेकर यांचा शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुखपदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ. चेतन खारकांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सक्षमच्या उपाध्यक्षा डॉ. शुभांगी खारकांडे यांनी सर्वांना तिळगूळ देऊन मकर संक्रमणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. यावेळी वसंत सुतार,अजय वणकुद्रे उपस्थित होते.
ब्रेल लेखन - वाचन स्पर्धेचा निकाल
लहान गट (इयत्ता पाचवी ते आठवी)
ब्रेल लेखन : सुशांत दाशाळ (द्वितीय) आणि नेताजी काणेकर (तृतीय).
ब्रेल वाचन : मुकुंद गिणगिणे (द्वितीय) आणि कान्होपात्रा शेंबडे (तृतीय).
मोठा गट (इयत्ता नववी ते बारावी)
ब्रेल लेखन : अतुल भगत (द्वितीय), सविता चौधरी (तृतीय).
ब्रेल वाचन : भिकाजी लोकरे(द्वितीय), रोहन लाखे (तृतीय).