कोल्हापूर : बोंद्रेनगर (बाळासाहेब इंगवलेनगर) येथील शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम २२ हजार रुपये असा सुमारे ५० हजार किंमतीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. गेल्या महिन्याभरात या परिसरात पाच ते सहा घरफोड्या झाल्याने नागरिकांच्यात भितीचे सावट पसरले आहे.
अधिक माहिती अशी, उमेश भागोजी आडुळकर हे शिक्षक आहेत. ते बोंद्रेनगर येथे आण्णा पाटील-भेडसगावकर यांच्या घरी भाड्याने राहतात. भावाचे लग्न असल्याने कुटूंबासह ते रविवारी (दि. ६) कणेरी पैकी धनगरवाडा (ता. पन्हाळा) येथे घराला कुलूप लावून गावी गेले होते.
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजास कुलूप नसल्याचे शेजारी राहणारे विजय राऊत यांच्या पत्नीने पाहिले. त्यांनी फोन करुन आडुळकर यांना माहिती दिली. गावावरुन ते कोल्हपूरला आले. घराचा दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.
आतमध्ये पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटले होते. त्यातील २२ हजार रुपये व सोन्याचा कानातील टॉप्स आणि अंगठी असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे दिसले. त्यांनी याबाबत करवीर पोलीसांत फिर्याद दिली.उमेश आडुळकर यांची पत्नीही शिक्षक आहे. भावाचे लग्न असल्याने त्यांनी घरातील दहा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने सोबत घेतले होते. ते दागिने कपाटात असते तर चोरट्यांची दिवाळी झाली असती. उमेश यांचा तीन महिन्याचा पगारातील २२ हजार रुपये त्यांनी कपाटात ठेवले होते. लग्न समारंभासाठी लागणाऱ्या किराणामाल वस्तु खरेदीसाठी ते ठेवले होते.
आडुळकर या घरी गेल्या चार वर्षापासून राहण्यास आहेत. यापूर्वी राहत असलेल्या घरामध्येही चोरी झाली होती. गेल्या महिन्याभरात या परिसरात पाच ते सहा चोऱ्या झाल्या आहेत. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक भयभित झाले आहेत. पोलीसांनी या परिसरात रात्रगस्त घालावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.