कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 05:31 PM2018-07-17T17:31:04+5:302018-07-17T17:33:46+5:30

देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

Kolhapur: CCTV cameras will be installed in Ichalkaranji city | कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

Next
ठळक मुद्देइचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणारतज्ज्ञांकडून सर्व्हे : चौकात, संवेदनशील ठिकाणी ३५ कॅमेरे बसणार

कोल्हापूर : देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या सर्व्हेनुसार चौकासह संवेदनशील ठिकाणी ३५ अत्याधुनिक कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकृत पुरवठादार, उत्पादक व नामांकित पुरवठादार तसेच स्थानिक विविध प्रमाणित कंपन्यांकडून ई-निविदा मागविली आहे.

कोल्हापूर शहरापाठोपाठ इचलकरंजी येथील गुन्हेगारीचा आलेख दरवर्षी चढता आहे. भरदिवसा लूटमार करून, मोटारीच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू गायब केल्या जातात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वृद्ध महिला व पुरुषांना तर चेनस्नॅचरनी लक्ष्यच केले आहे. घरफोड्या, हत्यारांची तस्करी, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.

कोल्हापुरात सुमारे साडेसहा कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा फायदा येथील पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी होत आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आली आहे.

दि. १७ ते ३० जुलैपर्यंत संकेतस्थळावर आॅनलाईन निविदा अपलोड करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी दुपारी एक वाजता निविदाधारकांसमोर ई-निविदा उघडण्यात येणार आहेत. कोणतीही निविदा कारण न देता मंजूर वा नामंजूर करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक यांनी राखून ठेवला आहे.

सीसीटीव्हीचा फायदा

सीसीटीव्हीमुळे इचलकरंजी शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवता येणार आहे. शहरात आलेले वाहन किती वेळाने बाहेर गेले, तसेच महिन्यातून ते वाहन किती वेळा इचलकरंजीत आले, याची माहिती ठेवणे सहज शक्य होणार आहे. अतिरेकी, दहशतवादी अथवा घुसखोरी करणाऱ्या लोकांचा वावर इचलकरंजीत आहे का? याची माहिती मिळणार आहे; तसेच शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होऊन चोऱ्या, लूटमारीतील संशयित आरोपींना पकडणे सोपे जाणार आहे.

कोल्हापूर शहराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. इचलकरंजी शहराच्या सुरक्षेसाठी लवकरच कॅमेरे बसविण्यात येतील.
- संजय मोहिते,
 पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 

Web Title: Kolhapur: CCTV cameras will be installed in Ichalkaranji city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.