कोल्हापूर : सर्किट बेंचप्रश्नी सहा जिल्ह्यांतील वकिलांची शुक्रवारी बैठक : प्रशांत शिंदे, आंदोलनाची दिशा, अवमान याचिकाबाबत चर्चा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:49 PM2017-12-19T17:49:13+5:302017-12-19T17:50:51+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे.
या बैठकीत सर्किट बेंचप्रश्नी पुढील आंदोलनाची दिशा व अवमान याचिकेबाबतचर्चा होणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी मंगळवारी दिली.
प्रशांत शिंदे म्हणाले, उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची आहे. याप्रश्नी निदर्शने, एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन अशी वेगवेगळी आंदोलने वकिलांनी केली आहेत. या सहा जिल्ह्यांत सुमारे १६ हजार वकील बांधव आहेत.
सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक व्हावी यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांना तुम्ही, मुख्यमंत्र्यांना बैठकीबाबत सांगा, अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनला भेटी देऊन तेथील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांची चर्चा व या बैठकीची पत्रे दिली आहेत.
वकिलांनीही या बैठकीला येणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे. अवमान याचिका व कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाबाबत वकिलांशी मते आजमावून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
याबाबत सेक्रेटरी अॅड. किरण पाटील म्हणाले, नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर प्रा. एन. डी. पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर सहा जिल्ह्यांना भेटी देऊन सर्वानुमते शुक्रवारच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला आहे.