कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, दिवसभर अधून मधून कोसळलेल्या हलक्या सरी वगळता उघडीप राहिली. जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस सुरू असल्याने तब्बल २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असली तरी जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.शनिवार, रविवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विशेषता शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने नद्यांचे पाणी वाढले आहे. गगनबावड्यात रोज अतिवृष्टी सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे.राधानगरी धरणक्षेत्रात ८०, दूधगंगा १०५, कासारी ८०, कडवी ८७, कुंभी १२०, पाटगाव २२५ तर कोदे धरणक्षेत्रात १५५ मिली मीटर पाऊस झाला आहे. परिणामी राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून प्रतिसेंकद १२०० घनफुट वेगाने पाणी भोगावती नदीत मिसळत आहे.
कुंभी धरणातून प्रतिसेकंद ३५०, घटप्रभा मधून २९८०, जांबरे मधून ६१७ तर कोदे मधून ५६५ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी फुगली आहे. जिल्ह्यातील तब्बल २५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वहातूक काहीसी विस्कळीत झाली आहे. पंचगंगेची पातळी २६.९ फुटावर असली तरी कासारी, भोगावती, वेदगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे.
पडझडीत पाच हजाराचे नुकसानगगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले येथील दिलीप धोंडीराम लटके यांच्या घराची भिंत कोसळून पाच हजाराचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
तालुकानिहाय पाऊस मिली मीटर मध्ये असा-हातकणंगले (१०.१३), शिरोळ (८.७१), पन्हाळा (१४.७१), शाहूवाडी (४८.००), राधानगरी (४९.५०), गगनबावडा (७१.५०), करवीर (१०.२७), कागल (२६.५७), गडहिग्लज (१७.८५), भुदरगड (४२.४०), आजरा (३७.२५), चंदगड (३८.१६).