कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगी मिळवून देण्याकरीता वरिष्ठांच्या नावाखाली विशिष्ट कर्मचारी संबंधितांकडून २५ हजार रुपयांची मागणी करतात, असा गंभीर आरोप सत्यजित कदम यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.
रोजरोसपणे सुरू असलेला हा भ्रष्टाचार रोखण्याकरिता २०० चौरस मीटर क्षेत्राचे अधिकार पुन्हा विभागीय कार्यालयाकडे सोपवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. नगररचना विभागातील भ्रष्टाचार, कामाची पद्धत आणि नागरिकांना होणारा त्रास यावर सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. बांधकाम असोसिएशनने सुद्धा यापूर्वी बरेच आरोप केले आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक होत आहे.
याबाबत मी सहा. संचालक नगररचना यांना सांगितले तरीही त्यामध्ये काही फरक पडलेला नाही, असे कदम यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. सोयीसाठी कायदा वापरू नका. वर्षानुवर्षे फायली फिरतात. आॅनलाईन सेवाप्रणाली अजून सुरू नाही. एक खिडकीही सुरू नाही, अशा तक्रारी करतानाच अनेक वर्षे येथे तळ ठोकून असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.व्यापाऱ्यांना अग्निशमन कर लावण्याबाबत देण्यात आलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी राहुल माने यांनी केली. एकाच व्यापाऱ्याला दोन कर लावता येतात का? अशी विचारणाही त्यांनी केली. खंडपीठ मान्यतेची प्रक्रिया अंतिम स्तरावर असून शेंडा पार्कची जागा जेवढी आवश्यक आहे तेवढी आहे का? महापालिकेच्या अखत्यारीत असलेस तातडीने नगररचना कार्यालयाने तपासणी करून जागा आरक्षित करावी लागते का, याची पडताळणी करा, अशी सूचना सभेत करण्यात आली.कदमवाडी स्मशानभूमीत फक्त तीनच कामगार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम देण्यात आले त्यांना परत स्मशानभूमीकडे पाठवा, अशी सूचना कविता माने यांनी केली. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवरील अतिक्रमणे काढलेली नाहीत. पादचाऱ्यांना चालायला जागा मिळत नाही. कनिष्ठ अभियंत्यावर त्याची जबाबदारी निश्चित करा, अशी सूचना प्रतीक्षा पाटील यांनी केली.मोकाट श्वानांवर निर्बिजीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल त्यासाठी बिल्डिंग तयार झाली आहे. रेबिज व्हेक्सिनकरिता टेंडर काढले आहे. ती १५ दिवसांत उपलब्ध होईल, असे यावेळी सांगण्यात आले. ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आताच पाण्याचे नियोजन करा. ‘एक दिवस आड पाणी’ सोडण्याचे नियोजन असल्यास प्रस्ताव महासभेत ठेवा, अशी सूचना संजय मोहिते यांनी केली.