कोल्हापूर : 'रंगबहार'तर्फे दि. वी. वडणगेकर यांना पाचवा जीवनगौरव, २१ जानेवारी रोजी रंगणार 'मैफल रंगसुरांची'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:28 PM2018-01-13T16:28:51+5:302018-01-13T16:37:18+5:30
रंगबहार या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत 'मैफल रंगसुरांची' हा सोहळा टाउन हॉल येथील उद्यानात पार पडणार आहे. याच वेळी पाचवा रंगबहार जीवन गौरव पुरस्कार दि. वी. वडणगेकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : चाळीसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रंगबहार या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत 'मैफल रंगसुरांची' हा सोहळा टाउन हॉल येथील उद्यानात पार पडणार आहे. याच वेळी पाचवा रंगबहार जीवन गौरव पुरस्कार दि. वी. वडणगेकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत जाधव यांनी दिली.
गेल्या ४० वर्षांतील चित्रचळवळीच्या इतिहासात 'रंगबहार' या संस्थेने कोल्हापूरच्या दृश्य कलेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संस्थेमार्फत कलारसिकांच्या साक्षीने कोल्हापुरात दरवर्षी जानेवारी महिन्यात 'मैफल रंगसुरांची' या नावीन्यपूर्ण उपक्रमातून देशातील प्रख्यात चित्रकार, शिल्पकार, रंगावलीकार, हस्तकला विशारद आणि गायक यांची प्रात्यक्षिके सादर करतात.
प्रत्येक वर्षी १६ जानेवारीनंतरच्या पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर 'मैफल रंगसुरांची' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची पाचवी मैफल रविवारी २१ जानेवारी रोजी होत आहे.
रंगबहारची कार्यकारिणी
हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी या मैफिलीस उपस्थित रहावे असे आवाहन 'रंगबहार'च्या कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.'रंगबहार'च्या नव्या कार्यकारिणीत दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी हे अध्यक्ष आहेत.
उपाध्यक्ष अमृत पाटील, सचिव धनंजय जाधव, सहसचिव अशोक पालकर, तसेच विजय टिपुगडे, सागर बगाडे, संजीव संकपाळ, अतुल डाके, सर्जेराव निगवेकर, किशोर पुरेकर, राहुल रेपे हे सदस्य आहेत. समन्वयक म्हणून रियाज शेख आणि उज्ज्वल दिवाण हे सक्रिय आहेत तर व्ही. बी. पाटील हे मार्गदर्शक आहेत.
दि. वी. वडणगेकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
ज्येष्ठ चित्रकार दि. वी. वडणगेकर यांना यवर्षी रंगबहार जीवनगौरव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार व्ही. ए. माळी (मरणोत्तर पुरस्कार), ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. टोपकर, ज्येष्ठ हस्तकलाकार विजयमाला मेस्त्री (बाबूराव पेंटर घराणे) आणि हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
हे कलावंत मैफिलीत होणार सहभागी
या वर्षीच्या मैफल रंगसूरांची या मैफिलीमध्ये देशभरातील कलावंत सहभागी होत आहेत. यामध्ये शास्त्रीय गायिका गौरी पाध्ये, तबला वादक प्रशांत देसाई, चित्रकार नेहा बन्सल, अरिफ तांबोळी, अदिती कांबळे, प्रितेश चिवटे, सत्यजित पाटील, स्वरूप कुडाळकर, आकाश गाडे, समाधान रेंदाळकर, भाऊसाहेब पाटील, स्वप्नील पाटील यांचा समावेश आहे. शिल्पकार म्हणून अजित चौधरी, अभिलाष भालेराव, सागर सुतार, किरण कुंभार, विजय कुंभार, अभिजित कुंभार यांचा, मांडणशिल्प कलाकार दीपक भुईंगडे, रांगोळीकार अमृत रासम आणि सूर्यकांत पाटील, तर मंदार वैद्य ओरिगामी कला सादर करणार आहेत.