कोल्हापूर : टाकाळा चौकात पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचाऱ्यांस मारहाण करुन खिशातील सहा हजार रुपये, मोबाईल, पॅनकार्ड व वाहन परवाना असा सुमारे पंधरा हजार किंमतीचा मुद्देमाल दोघा लुटारुंनी लुटला. ही घटना बुधवारी (दि. ३) रोजी घडला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन लुटारुंचा पोलीस शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी, संजय बापु दिंडे (वय ३९, रा. टाकाळा, राजारामपूरी) हे बांधकामाचे साहित्य पुरवितात. बुधवारी ते राजारामपूरीतील पाहुण्यांच्या घरी गेले होते. दूचाकी सर्व्हिसिंगला सोडल्याने जेवण करुन ते रात्री दहाच्या सुमारास चालत आपल्या टाकाळा येथील घरी जात होते.
यावेळी पाठिमागुन दूचाकीवरुन दोघे तरुण आले. त्यांनी ‘मामा’ अशी हाक मारुन पत्ता विचारण्याचा बहाण करीत त्यांना थांबविले. त्यानंतर अचानक हातात दगड घेवून डोक्यात, डावे कानावर, हातावर मारहाण केली. या प्रकाराने दिंडे बिथरुन गेले. त्या दोघा तरुणांनी त्यांच्या खिशतील पैशाचे पाकिट जबरदस्तीने काढून पोबारा केला.
त्यानंतर दिंडे यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. टाकाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. चोरटे हे रेकॉर्डवरील असण्याची दाट शक्यता असल्याने कावळा नाका, टेंबलाई रेल्वे फाटक, विक्रमनगर, सदर बझार, शिवाजी पार्क, कावळा नाका परिसरातील गुन्हेगारांची झडती सुरु आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देवून तपासासंबधी मार्गदर्शन केले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.