कोल्हापूर : परिवहन क्षेत्राला मारक असलेली सरकारची चुकीची धोरणे व दादागिरी यांच्याविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या आदेशानुसार देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेले देशव्यापी चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या मेळाव्यात सर्वांनुमते करण्यात आला.शुक्रवारपासून होणाऱ्या आंदोलनात नियमित होणारी डिझेल दरवाढ रद्द करावी. टोल प्रक्रिया पारदर्शी करावी. थर्ड पार्टी विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी; जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणारा विलंब यांत सुधारणा करावी.
पर्यटन वाहनासाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे. आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीररीत्या आकारणी होणारा आयकर रद्द करा. आॅल इंडिया परमिट असलेल्या वाहनांवर दोन चालकांची सक्त रद्द करावी, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.
यानिमित्त शाहूपुरीतील वसंतराव चौगुले सभागृहात कोल्हापुरातील ट्रक, टेम्पो, टँकर, बसवाहतूक करणाऱ्या मालकांसाठी जनजागृती मेळावा आयोजित केला होता. त्यात महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांनी शनिवारपासून पुकारलेले चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डेसले, बाबलशेट फर्नांडिस, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, बबन महाजन, आदी पदाधिकारी उपस्थित होते.