कोल्हापूर : शिक्षक संघटनानी आपसातामधील मतभेद मिटवावा, कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समिती बैठकीत सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:27 PM2018-01-27T16:27:21+5:302018-01-27T16:30:50+5:30
मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीत उमटला.
कोल्हापूर : मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीत उमटला.
राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी शाळा बंद पडून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहणार आहे. याबाबत जनआंदोलन उभे करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शनिवारी मुस्लिम बोर्डिंग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस शिक्षक संघटना, सामाजिक संस्था, नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत यादव म्हणाले, शिक्षक संघटना एकत्रित येणे अवघड आहे, मात्र या संघटना एक त्र आल्या नाहीतर सामान्य लोक या आंदोलनात पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे संगटनांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, हे आंदोलन शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या पर्यंतच मर्यादित न ठेवता. हे आंदोलन गावपातळीवर पोहचले पाहिजे. कमी पटसंख्यांच्या शाळा बंद होवू नयेत, यासाठी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांची भेट घेवून आपली भूमिका मांडणे गरजे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमी पटसंख्या शाळा बंद करू नये याबाबतचा ठराव करावा.
राजेंद्र कोरे म्हणाले, या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करणे गरेजे आहे. यावेळी गणी आजरेकर, डॉ. सुभाष जाधव, किशोर घाडगे यांनी सूचना मांडल्या. कृती समितीचे राज्य समन्वयक गिरीष फोंडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक, ब्लॅक पँथरचे संस्थापक सुभाष देसाई, प्राचार्य. टी. एस. पाटील, अॅड. पंडीतराव सडोलीकर,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, पी. आर. गवळी, रामभाऊ कोळेकर, महादेव जाधव, बी. एस. खामकर, प्रसाद पाटील,सुवर्णा तळेकर,शिक्षक संघटना, सामाजिक संस्था, नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती
मंगळवारी ‘मौन’ आंदोलन
कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने मंगळवारी, महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी मैदान येथे मौन आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.