कोल्हापूर : माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामध्ये केवळ मेहुण्या-पाहुण्यांचे नाते नाही तर चार पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे राधानगरी-भुदरगडमधील भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांना तराटणी दिली.राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष निवडीची बैठक रविवारी पक्ष कार्यालयात झाली. यामध्ये मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्यात निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासमोरच चांगलीच फटकेबाजी रंगली. ए. वाय. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास जमले नसल्याचे सांगत के. पी. पाटील यांनी या मुद्द्याला हात घातला.
के. पी. पाटील म्हणाले, ‘ए. वाय.’ नेमके कोठे आहेत, अशी विचारणा त्यांच्या धाकट्या बंधूंकडे केली; पण त्यांनी आपणाला त्यांचा पत्ता माहीत नसल्याचे सांगितले. ते अर्जुनवाडा येथे गेल्याचे समजल्याने तिथे गेलो; पण तोपर्यंत ‘ए. वाय.’नी स्टार्टर मारला होता.
दाजींना शुभेच्छा देऊ न शकल्याने मला रात्रभर झोप लागली नाही. या निवडीच्या निमित्ताने आज भेट झाली, बरे झाले. परमेश्वरकृपेने त्यांची प्रकृती उत्तम राहो आणि त्यांनी येथून पुढे पक्षाचेच काम (आमदारकी मागू नये) करावे, असा चिमटा काढला.
‘बिद्री’च्या निवडणुकीपासून ‘के. पीं.’च्या स्वभावात बदल झाल्याचे सांगत हसन मुश्रीफ म्हणाले, पहिले ते मनमिळाऊ, सगळ्यांना बरोबर घेऊन जात होते. ‘ए. वाय.’ना शुभेच्छा देताना त्यांनी पक्षाचेच काम करण्याचा सल्ला दिला. या दोघांमध्ये चार पिढ्यांचे नाते आहे; पण त्यांच्याविषयी जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरू असून, राधानगरी-भुदरगडचे भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ही चर्चा थांबली पाहिजे.भाजप सरकारवर टीका करताना मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री सहज ५० लाख, कोटींची भाषा करतात. या मंडळींना कोटी म्हणजे काय वाटेनाच; पण ‘ याद रख सिकंदर के हौसले तो बुलंद थे, वो जब गया था दुनिया से उसके दोनों हाथ खाली थे’ याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवावे. कार्यकर्ते अशा प्रवृत्तीचा नि:पात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.खासदारांचे जेवण आणि मुश्रीफांचा खुलासाखासदार धनंजय महाडिक यांच्या घरी रविवारी रात्री जेवण असले तरी आपण बाबूराव हजारे यांच्याकडे जेवणास जाणार असल्याचा खुलासा मुश्रीफ यांनी केला; तर नियोजित कार्यक्रमामुळे जेवणास येऊ शकत नसल्याचे के. पी. पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितल्याने अस्वस्थ होऊन, ‘ही गोष्ट काय जाहीर सांगायची आहे का?’ अशी नाराजी महाडिक यांनी व्यक्त केली.तर पाच जागा लढविणारदोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चा सुरू असून आघाडी झाली नाही तर विधानसभेच्या १० जागा ताकदीने लढविणार आहे. आघाडी झाली तर पाच जागांवर राष्ट्रवादी लढेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘के. पी.’कडे साखर आहे की!आम्ही सत्तेत नाही; त्यामुळे कोणाला विधान परिषद देतो असे सांगणार नाही; पण या पाच वर्षांत कोण आणि त्यापुढे कोण हे एकत्र बसून ठरवू शकतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले. यावर हसत-हसत त्यांच्याकडे (के. पी. पाटील) ‘साखर आहे की!’ असे सूचक वक्तव्य ए. वाय. पाटील यांनी केले.
संजय घाटगेंना शुभेच्छा अन्...कागलमध्ये रविवारी माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. ते शिवसेनेकडून लढणार असल्याचे वाचले; पण त्यांच्या सत्काराला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, संभाजीराजे हे भाजपचे नेते दिसतात; शिवसेनेचे कुणी दिसत नसल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.