कोल्हापूर : लाईन बझार पद्मा पथकाजवळ भरधाव आलिशान कार धडकून रस्त्यावरील विद्युत खांब कोसळला. यावेळी खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींची मोडतोड झाली तर कारमधील दोघेजण जखमी झाले. अमोल अशोक जाधव (२२, रा. लाईन बझार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. अपघातादरम्यान रस्त्यावर वाहनधारकांची वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.अधिक माहिती अशी, राहुल नंदकुमार जाधव (लाईन बझार, छावा चौक) यांच्या मालकीची सुमारे ३४ लाख किमतीची आलिशान कार नातेवाईक संग्रामसिंह विलासराव जाधव, अमोल जाधव व राहुल जाधव असे तिघेजण बाहेरगावी गेले होते.
रविवारी मध्यरात्री घरी परतत असताना घरापासून काही अंतरावरील पद्मा पथकाजवळ संग्रामसिंह जाधव याचा भरधाव कारच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती रस्त्यावरील विद्युत खांबाला धडकली. धडक इतकी जोरात होती की, विद्युत खांब रस्त्यावर कोसळला. या खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
कारच्या समोरील काच, डेडलाईट, बॉनेट, बंपर, इंजिन आॅईलचे सुमारे दीड लाख किमतीचे नुकसान झाले. रिक्षाचालक विलास पांडुरंग धुमाळ, चंद्रकांत शिर्के, तस्लिम असेफ शेख, प्रफुल्ल विलासराव धुमाळ, गजानन दिनकर जाधव, शामराव वसंतराव घाटगे (सर्व रा. लाईन बझार) आदींच्या वाहनांचे सुमारे ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले.विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने त्याच्या वाहिन्याही रस्त्यावर लोंबकळत होत्या. त्यातून विद्युत प्रवाहासह सुरू असल्याने नागरिकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ अग्निशामक दलास फोन केला. जवान ओंकार खेडकर, रमेश पोवार, सुरेंद्र जगदाळे, निवास जाधव, तानाजी वडर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘
महावितरण’च्या वायरमनना बोलावून विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर कारमधील जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अपघात मध्यरात्री घडला त्यावेळी विद्युत खांब कोसळल्याने त्यावरील वाहिन्या रस्त्यावर लोंबकळत होत्या. रस्त्यावर कोणी नागरिक नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.पोलिसाची मध्यस्थीअपघातानंतर एका पोलिसाने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. नुकसान झालेल्या वाहनधारकांना भरपाई भरून देण्याची त्याने जबाबदारी स्वीकारल्याने रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता; परंतु या घटनेची नोंद महापालिका अग्निशामक दलाकडे झाली.