- संदीप आडनाईक कोल्हापूर - दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राकडून आलेल्या डॉ. हनूल ठक्कर, डॉ. सोनटप्पन यांच्या तपासणी पथकाने शुक्रवारी अन्न व औषध प्रशासक विभागाला भेट दिली. दिवसभरात त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची यांची भेट घेतली. या दौऱ्यात त्यांनी तीन दिवसांत रेबीजसंदर्भात अनेक ठिकाणी माहिती घेतली. वरिष्ठांशी चर्चा करुन यासंदर्भातील शिफारशी आठ दिवसात राज्य सरकारला ते सादर करतील, त्यानंतर कोल्हापूर प्रशासनाला कळवण्यात येणार आहे. हे पथक उद्या, शनिवारी दिल्लीकडे रवाना होणार आहे.
सुभाष रोडवरील अन्न आणि औषध प्रशासक विभागाला या पथकाने शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भेट दिली. रेबीज लसीची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांची ही भेट होती. याठिकाणी ते अर्धा तास होते. अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक मनोज अय्या, सहाय्यक औषध निरिक्षक तुषार शिंगाडे यांनी त्यांचे स्वागत केले. लेखी पत्रव्यवहार केल्यानंतर कांही नमुने दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. राज्य सरकारमार्फत डॉ. अमोल मानकर तपास अधिकारी होते.
या पथकाने त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांच्याशी चर्चा केली. महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल पाटील, डॉ. आरती बिराजदार, जिल्हा परिषदेचे डॉ. सतोष तावशी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी, आयुक्तांशीही केली चर्चापथकाने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांचीही भेट घेतली. जिल्हापरिषदेच्या आराेग्य अधिकाऱ्यांसह महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यावेळी उपस्थित होते.