कोल्हापूर : जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकाला अनन्यसाधारण महत्त्व : न्हावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:36 PM2019-01-05T17:36:51+5:302019-01-05T17:37:59+5:30
न्यायालयात जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकांच्या कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लघुलेखकांनी आपले काम अत्यंत प्रभावी होण्यासाठी भाषा आणि व्याकरण आत्मसात केले पाहिजे. त्यामुळे जलद न्यायनिर्णय टंकलिखित करणे सोपे जाईल, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र व न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी येथे व्यक्त केले.
कोल्हापूर : न्यायालयात जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकांच्या कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लघुलेखकांनी आपले काम अत्यंत प्रभावी होण्यासाठी भाषा आणि व्याकरण आत्मसात केले पाहिजे. त्यामुळे जलद न्यायनिर्णय टंकलिखित करणे सोपे जाईल, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र व न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी येथे व्यक्त केले.
लघुलिपीचे जनक आयजॅक पिटमन यांच्या जन्मदिनानिमित्त लघुलेखकदिन प्रसंगी शुक्रवारी (दि. ४) जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एन. व्ही. न्हावकर यांनी पिटमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी न्हावकर म्हणाले, जलद न्यायदान प्रक्रियेत संगणक प्रणाली आत्मसात करणे फार महत्त्वाचे ठरते. पूर्वीच्या टंकलेखन यंत्राऐवजी संगणक प्रणालीमुळे लघुलेखकांच्या कामात गती प्राप्त झाली आहे. हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्व लघुलेखकांनी संगणक प्रणालीचे काम करीत खोलवर अभ्यास करायला हवा, तरच पक्षकारांना एका क्लिकवर त्यांच्या न्यायिक प्रकरणामध्ये न्यायिक आदेश यांची माहिती, तसेच त्यांचे प्रकरण कोणत्या स्टेजवर आहे, हे त्यांना समजू शकणार आहे. त्यामुळे न्यायदान प्रक्रियेतील पारदर्शकता दिसण्यास मदत होणार आहे. यानंतर न्हावकर यांनी सर्व लघुलेखकांना चांगले काम करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा न्यायाधीश अमित शेटे, प्रबंधक दीपक जाधव, लघुलेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गुजर उपस्थित होते. अभिजित गायकवाड यानी प्रास्ताविक केले. काशिद यांनी सूत्रसंचालन केले. तर श्रीकांत सुतार यांनी आभार मानले.