कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम भागास जोडण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहेत. त्यासाठी आठ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. तसेच या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाला दुभंगणा-या जुन्या पुणे-बेंगळुरू महामार्गामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. रोज या मार्गावरून दोन ते तीन हजार लोकांची ये-जा सुरू असते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी होती. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.