कोल्हापूर : ग्राहकांच्या दारात जा, कर्मचारी कार्यशाळेत हसन मुश्रीफ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:45 PM2018-05-14T16:45:46+5:302018-05-14T17:02:52+5:30
ग्राहक दैवत आहे, जिल्हा बॅँकेची मक्तेदारी संपुष्टात आली असून कर्मचाऱ्यांनी डोक्यातून हवा काढून ग्राहकांच्या दारात जावे, असे आवाहन करत तुम्ही व्यवसाय किती करणार यावरच तुमचा गोपनीय अहवाल (सी. आर) राहील, अशा शब्दांत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला.
कोल्हापूर : राष्ट्रीयकृत बॅँकांचे वरिष्ठ अधिकारी आता व्यवसायवृद्धीसाठी ग्राहकांच्या दारात जात आहेत, आपण कोठे आहोत याचे आत्मचिंतन करावे. ग्राहक दैवत आहे, जिल्हा बॅँकेची मक्तेदारी संपुष्टात आली असून कर्मचाऱ्यांनी डोक्यातून हवा काढून ग्राहकांच्या दारात जावे, असे आवाहन करत तुम्ही व्यवसाय किती करणार यावरच तुमचा गोपनीय अहवाल (सी. आर) राहील, अशा शब्दांत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला.
जिल्हा बॅँक कर्मचाऱ्यांचा झालेल्या गुणगौरव व व्यवसाय वृद्धी कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच तीनशे कोटींचा संचित तोटा कमी होऊन बॅँक नफ्यात आली. आता नवीन उद्दिष्ट घेऊन पुढे जात असताना बॅँकिंग क्षेत्रात नवीन आव्हानांनाही तोंड द्यावे लागणार आहे. चलनटंचाई आहे, त्यासाठी पानपट्टीच्या टपरीपासून पेट्रोलपंपापर्यंतचे चलन बॅँकेत आले पाहिजे, असे प्रयत्न करा.
चलन व्यवस्थापन शाखांच्या पातळीवर करा, जिथे अडचण येईल तिथे संचालकांना सांगा. कोणत्याही परिस्थितीत बॅँकेचा व्यवसाय वाढला पाहिजे, येथून पाठीमागे जिल्हा बॅँकेकडे ग्राहक येत होता, आता ही मक्तेदारी संपली असून ग्राहकांच्या दारात जावे. पिग्मी एजंट नेमायचे आहेत, बॅँकेच्या योजना, सुविधांचे योग्य प्रकारे मार्केटिंग केल्यास उत्पन्न वाढणार आहे.
ज्येष्ठ संचालक पी. जी. शिंदे, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, डी. एस. कालेकर, रणवीर चव्हाण, पंडित चव्हाण, उपाध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी आढावा घेऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी मार्गदर्शन केले. उदयानी साळुंखे यांनी आभार मानले. निवेदिता माने, भैया माने, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. उत्कृष्ट काम केलेले कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला.
‘ते’ दुबईला गेल्याने आता वसुली होईल
गायकवाड कारखान्याच्या संपूर्ण कर्जाची परतफेड झाल्याबद्दल मानसिंगराव गायकवाड यांचे अभिनंदन करत खट्याळ थकबाकीदारांसाठी आता कडक भूमिका घेणार आहे. त्या संस्थांचे संचालक दुबईला जाऊन आल्याने आमचे कर्ज परतफेड करतील, असा टोला मुश्रीफ यांनी तंबाखू संघाचे संजय पाटील यांना लगावला.
‘रोजंदारी’चा प्रश्न लवकरच मार्गी
कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन हातात घेतले आहे, रोजंदारी व अनुकंपाखालील कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे अभिवचन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
जिल्हा बॅँकेच्या नवीन योजना
सुवर्ण बचत खाते योजनेसाठी ६.८० टक्के व्याजदर असून ‘वसंत वर्षा’ ठेव योजनेसाठी ठेवीच्या रकमेनुसार ८.५ पासून ९ टक्यांर्यंत व्याज दिले जाणार आहे. त्याची घोषणा अध्यक्ष मुश्रीफ यांनी जाहीर केली.
‘पी. जीं.’ च्या कानपिचक्या
पी. जी. शिंदे यांनी आक्रमकपणे कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. संलग्न संस्थेचे सेवक म्हणून काम करा, पूर्वीपेक्षा आपल्या कामकाजात फारसा फरक झालेला नाही. बॅँकेच्या परिपत्रकाला जर तुम्ही शून्य किंमत देणार असाल तर उद्दिष्ट कसे गाठणार, असे त्यांनी सुनावले.