कोल्हापूर : अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला ३५ किलोवरून पाच किलो धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांचे अन्न काढून घेत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला.गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात अंत्योदय योजनेतून महिन्याला ३५ किलो धान्य दिले जात होते. त्यामध्ये कपात करून पाच किलो दिले जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे महागाईचा आगडोंब उडाला असताना दुसऱ्या बाजूला मिळणारे हक्काचे धान्य कपात करून सरकारने गरिबांच्या पोटावर मारल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. संबंधित लाभार्थ्यांचे धान्य पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी केली.मुंबई, पुणे, सातारा शहरांत बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून सरकार काय उपाययोजना करणार आहे? अशी विचारणा आमदार पाटील यांनी दिली. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची कबुली देत ती रोखण्यासाठी व बालगुन्हेगारांचे पुर्नवसन करण्याबाबत सरकार गंभीर आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक असे ३५ बालन्याय मंडळे व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.