कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादावादीवेळी त्यांनी हा आरोप केला.महापौर निवडीसाठी ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत पोलिसांकडून सोडण्यात येत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आत जाताना त्यांच्याकडून पोलिसांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यावर आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी ओळखपत्र तपासणीचे काम महानगरपालिका प्रशासनाचे आहे.पोलिसांचे नाही असे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी सुरक्षेच्या कारणावरून ओळखपत्राची तपासणी केली जात आहे.
सर्व नगरसेवकांच्या ओळखपत्राची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. त्यावरून आमदार मुश्रीफ, आमदार पाटील आणि पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्या जोरदार वादावादी सुरू झाली.
पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी आम्ही नोकरी करतो, राजकारण करत नाही. हवं तर गडचिरोलीला जातो, पण वाटेल ते बोलू नका असे प्रतिउत्तर दिले. या दरम्यान, अन्य पोलिस कर्मचारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद थांबविला. या वादावादीमुळे याठिकाणी काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.