कोल्हापूर : ‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, ३०० तक्रारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:17 PM2018-06-28T14:17:07+5:302018-06-28T14:20:12+5:30
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर पोलिसांनी डीएसकेच्या कोल्हापुरातील टोप-संभापूर, सांगलीतील मालगांव व सोलापूर तर पुणे पोलिसांनी पुणेसह मुंबई येथील ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत ३०० गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून फसवणुकीचा आकडा १९ कोटींपर्यंत गेला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी दिली.
ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके ग्रुपवर पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसायांतील ६०० गुंतवणूकदारांनी एक लाखापासून ते १० कोटी अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या असल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत कोल्हापुरातील तीनशे गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांची मुख्य तक्रार आहे. या गुन्ह्यात फसवणूक झालेल्या २९९ गुंतवणूकदारांना साक्षीदार केले आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्यांचा पुणे व मुंबई पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. महाराष्ट्र सुरक्षा गुंतवणूकदार अधिनियम कायद्यानुसार ‘डीएसके ग्रुप’च्या पुणे व मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील ५०० स्थावर मालमत्ता सील केल्या आहेत.
सध्या डीएसके दाम्पत्य येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या तिघांचा ताबा कोल्हापूर पोलीस घेणार आहे. येथून अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २९ जूनला सुनावणी होणार आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळावा म्हणून जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल सरकार पक्षातर्फे बाजू मांडणार आहेत. ‘डीएसके’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे, ती शासनाने लिलावात काढल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.